पुणे : मद्यपी दुचाकीस्वाराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी पाच दिवसांचा साधा कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात रब्बीन शेख (वय २९) याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावली. कोथरूड वाहतूक शाखेतील पाेलीस कर्मचारी ३ ऑगस्ट २०२४ रोजी पौड फाटा येथे नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास  दुचाकीस्वार रब्बीन शेख भरधाव वेगाने निघाला होता. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी बाजू मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीने वाहन परवाना नसताना दारूच्या नशेत धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविली. असे जाधव यांनी युक्तिवादात नमूद केले. आरोपीचे वय आणि पहिलाच गुन्हा असल्याने न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २८५ (२) नुसार शिक्षा सुनावली. आरोपीने दंड न भरल्यास २० दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth sentenced to five days in jail and fined for driving a two wheeler after drinking alcohol pune print news rbk 25 amy