अन्वयार्थ  : बटाटय़ासाठी आटापिटा

केंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील बटाटा पिकाला अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.

potato
(संग्रहित छायाचित्र)

सतराव्या शतकात पेरू या देशातून भारतात आलेल्या बटाटा या कंदमुळाने आता आपले येथील स्थान इतके भक्कम केले आहे, की तो प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला. त्यामुळेच बटाटय़ाचे दर पुढील वर्षभर चढेच राहणार, ही बातमी तोंडचे पाणी पळवणारी आहे. एकीकडे इंधनाची दरवाढ होत असताना, त्याच वेळी बटाटय़ासारख्या अत्यावश्यक कंदाचीही भाववाढ होणे, ही अधिक अडचणीची बाब ठरणार आहे. जगात चीनखालोखाल सर्वाधिक बटाटय़ाचे उत्पादन घेणाऱ्या भारतात देशांतर्गत उपयोगच इतक्या मोठय़ा प्रमाणात होतो की निर्यात करण्यासाठी तो फारसा उरतच नाही. गुजरात आणि प. बंगालमध्ये बटाटय़ाचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात येते. केंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील बटाटा पिकाला अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. परिणामी उत्पादन ५६१ लाख टन अपेक्षित असताना प्रत्यक्ष ५३६ लाख टनांवर आले आहे. सरासरी १५ टक्क्यांनी उत्पादन कमी झाले आहे. यंदा तेथील लागवडच कमी झाल्याने, देशातील बाजारात त्याची काही प्रमाणात तरी कमतरता भासणार आहे. परिणामी त्याचे भावही वाढण्याची शक्यता आहे. अर्थातच त्यामुळे भारतीयांचा आवडता असलेला वडापावही महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टिकाऊपणा हा महत्त्वाचा गुणधर्म असलेल्या बटाटय़ाने जगातील सगळय़ाच नागरिकांना आपलेसे केले. त्यामुळे जगभरात नेहमीच लोकप्रिय असलेल्या बटाटय़ाच्या दरवाढीने सामान्यांचाही हिरमोड होणार आहे. देशात रब्बी हंगामात बटाटय़ाची लागवड केली जाते. लागवड करताच पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा या राज्यांत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे पिकाची उगवण चांगली झाली नाही, जास्त पाणी झाल्यामुळे बटाटय़ाचे पीक पिवळे पडून जळून गेले होते. त्यानंतर पीक काढणीच्या वेळेत म्हणजे मार्च, एप्रिल महिन्यांत देशभर उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. या लाटांचा गव्हाच्या उत्पादनाला जसा फटका बसला, तसाच फटका बटाटा पिकाला बसला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे देशातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत २५ टक्के उत्पादन एकटय़ा गुजरातमध्ये होते. यंदा एकूण १.२६ लाख हेक्टरवर लागवड होऊन ३८.३० लाख टन बटाटा उत्पादन झाले आहे. हे उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी आहे. त्यानंतर बटाटा उत्पादनातील दुसऱ्या क्रमाकांचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये बटाटा उत्पादन २३ टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२१ मध्ये १११ लाख टनांवर असलेले उत्पादन ८५ लाख टनांवर आले आहे. घरगुती जेवणात बटाटय़ाचा जसा भरपूर वापर होतो, त्याहून जास्त वापर त्यापासून बनवण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक उत्पादनांचा होतो. वेफर्स, चिवडा, पापड यांसारख्या पदार्थानी भारतीय घरांमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. त्याशिवाय औषधी उपयोगासाठीही बटाटय़ाचा उपयोग करण्यात येतो. बारमाही उपलब्ध होणाऱ्या बटाटय़ाने आपले जिव्हालालित्य रसपूर्ण केले आहे. अपेक्षित दरवाढीने नेहमीप्रमाणे सामान्यांची होरपळच जास्त होईल, मात्र बटाटय़ाच्या आयातीने त्यावर उपाय योजता येतील. खरे तर अधिक उत्पादन घेऊन बटाटय़ाची निर्यात करण्याची क्षमता भारताने वाढवायला हवी. परंतु कृषी धोरणातील गोंधळामुळे शक्यता असूनही त्याकडे कायमच दुर्लक्ष झाले आहे.

मराठीतील सर्व अन्वयार्थ ( Anvyartha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Potato prices increasing due to shortage of supply zws

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी