‘माझे नाव सदानंद. मी खेडय़ात राहतो. आमच्या संयुक्त कुटुंबात चुलीवर स्वयंपाक करण्यात घरातील सर्व महिलांचे आयुष्य गेले. माझी आजी, आई, काकू, बहिणी या साऱ्यांना रोज उकिडवे बसून रांधावे लागले. त्यामुळे लवकरच या सर्वाना कंबरदुखी, मणके व गुडघ्याच्या आजाराला सामोरे जावे लागले. रोज सकाळ, संध्याकाळ धूर डोळय़ात गेल्याने त्याचेही आजार बळावले. त्यावर आम्हाला खूप खर्च करावा लागला. २०१४ नंतर सरकारने गरिबांसाठी उज्ज्वला योजना जाहीर केली. त्याच्या लाभार्थ्यांच्या यादीत आमचे नाव आल्यावर अत्यानंद झाला. घरात गॅस येणार म्हणून आम्ही सावकाराकडून थोडे कर्ज काढून उंच ओटा बांधून घेतला. त्यावर गॅसची स्थापना झाल्यावर घरातील महिला आनंदून गेल्या. उभे राहून धूरविरहित स्वयंपाक करण्यामुळे त्यांचे डोळे व कंबरेचे दुखणे बरेच कमी झाले. घरात सदस्यसंख्या जास्त असल्याने सिलेंडर लवकर संपू लागले. प्रारंभी जुळवाजुळव करून आम्ही ते भरून आणले. नंतर त्याचे भाव सातत्याने वाढू लागले. एकदा तर घरून गॅस एजन्सीपर्यंत जाईस्तोवर अचानक पन्नास रुपये वाढले. त्यामुळे परत यावे लागले. नंतर सातत्याने दरवाढ होत राहिल्याने आम्ही नवे सिलेंडर आणण्याचा नाद सोडला. दु:खात आनंद शोधणे ही आमच्या कुटुंबाची वृत्ती आहे. त्यामुळे मन खट्टू होऊ न देता आम्ही स्वयंपाकाच्या ओटय़ावर पुन्हा चूल ठेवली. त्यामुळे घरातील महिलांची उभ्याने स्वयंपाक करण्याची सवय कायम राहिली आहे. तो करताना थोडा थकवा आलाच तर त्या बसण्यासाठी रिकामे सिलेंडर वापरू लागल्या आहेत. ओटा उंच असल्यामुळे चुलीतून निघणारा धूर डोळय़ात न जाता मागच्या खिडकीतून बाहेर पडू लागला. याचा खूपच फायदा महिलांना झाला आहे. त्यांचे कंबरेचे दुखणे पळाले. डोळेही चांगले राहू लागले आहेत.  उपचाराच्या खर्चात बचत झाली. स्वयंपाक आटोपल्यावर त्याच सिलेंडरचा उपयोग कधी कांद्याची टोपली, घरातली एकमेव सुटकेस तर कधी रेडिओ ठेवण्यासाठी होऊ लागला आहे. आता तर हे बहुपयोगी रिकामे सिलेंडर आमच्या घरातला अविभाज्य घटक झाले आहे. ते हलके असल्याने घरातील मुलेही कधी कधी खेळण्यासाठी त्याचा वापर करतात व स्वयंपाकाच्या वेळी ओटय़ाजवळ आणून ठेवतात. त्यामुळे गॅसचे भाव वाढले तरी आम्ही सरकारवर अजिबात नाराज नाही. या योजनेमुळेच आमच्या घरात ओटा होऊ शकला व रिकामे सिलेंडर महिलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी वरदान ठरले. आता सरकारने कितीही गॅस दरवाढ केली तरी आमची काही हरकत नाही. फक्त हे रिकामे सिलेंडर परत करा असा नवा आदेश काढू नये एवढीच आमच्या एकवेळच्या लाभार्थी कुटुंबाची अपेक्षा आहे.’ उज्ज्वला योजनेची ही ‘अनोखी’ यशोगाथा देशातील मोजक्या माध्यमात प्रकाशित झाली व सरकारचे त्याकडे लक्ष गेले. नंतर लगेच वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या व याचा येत्या निवडणुकीत जाहिरात म्हणून कसा वापर करता येईल यावर मंथन सुरू झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीप : या यशोगाथेचा ताज्या दरवाढीशी काहीही संबंध नाही. कुणाला तसे वाटल्यास तो योगायोग समजावा.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chashma beneficiary bright present cooking women life ujjwala yojana poor ysh