आयएसआयच्या इस्लामाबादस्थित मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेल्या सभागृहात ‘त्या’ सैनिकाने प्रवेश करताच टाळय़ांचा कडकडाट झाला. शेजारच्या शत्रुराष्ट्रातील दोन ‘संस्कारी’ अधिकाऱ्यांना ‘मधुमोहिनी’त- अर्थात ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याची देदीप्यमान कामगिरी यशस्वीपणे पार पाडणारा हा आधुनिक ‘विषपुरुष’ आता काय अनुभवकथन करतो याची उत्सुकता सर्वाना लागली होती. शत्रुराष्ट्राच्या सैन्यात असलेले आपल्या ‘कौम’चे लोकच गद्दार असतात या समजुतीला तडा देणारी ही कामगिरी असल्याने साऱ्यांचे लक्ष त्या सैनिकाकडे लागले होते. ऊठसूट देशभक्तीचा आव आणणाऱ्या संस्कारींना मोहात अडकवण्यासाठी महिलेची गरज नाही, एक पुरुषसुद्धा ही कामगिरी बजावू शकतो हे सिद्ध झाल्याने उपस्थितांचे कान त्या सैनिकाला ऐकण्यासाठी आतुर झाले होते. मग जास्त वेळ न दवडता तो उभा राहिला व ‘हजरात’ असे सर्वाना संबोधून बायकी आवाजात बोलू लागला. ‘हनी ट्रॅप’चे रीतसर प्रशिक्षण घेतल्यावर मी जेव्हा शेजारी देशातील सैन्य अधिकाऱ्यांच्या वर्तनशैलीचे बारकाईने निरीक्षण केले तेव्हा असे लक्षात आले की, नीती-अनीती, श्लील-अश्लीलतेवर अधिकारवाणीने बोलणारे लोकच जास्त स्खलनशील असतात. त्यांना जाळय़ात अडकवायचे असेल तर त्यांच्या भावना उद्दीपित करायला हव्यात. त्यासाठी ‘कामुक’ चर्चेची गरज नाही.
नुसता राष्ट्रवादाचा विषय काढला व तो प्राचीन काळापासून कसा तुमच्या देशात रुजला आहे हे चढवून सांगितले की हे अधिकारी आम्हीच कसे श्रेष्ठ असे सांगत भडाभडा बोलायला सुरुवात करतात. त्यांचे ऐकून घेणारी समोरची स्त्री असेल तर त्यांचा पुरुषार्थ अधिकच खुलतो. प्राचीन काळी तुमचा देश कसा संशोधनात तरक्कीदार होता असे सांगत पुष्पक विमान आदीचे दाखले दिले की आनंदून जात हे अधिकारी नव्या संशोधनाची माहितीसुद्धा सहज देऊन टाकतात. या दोघांच्या बाबतीत मला हाच अनुभव आला. या चर्चेत त्यांना अधिक गुंतवून ठेवण्यासाठी मी आधी त्या देशातील वीरश्री संचारणाऱ्या पौराणिक कथांचा अभ्यास केला. त्या चांगल्या पाठ करून घेतल्या. मग त्यावर आधारित एकेक प्रश्न विचारत गेलो. त्यांच्या श्रेठत्वाच्या भावनांना कुरवाळत गेलो तसे ते अधिक मोकळे होते गेले. कोणत्याही पुरुषाला महिलेसमोर फुशारकी मारणे आवडते. त्यातल्या त्यात आपल्या टार्गेटवर असलेले हे पुरुष एका विशिष्ट परिवाराशी जुळलेले. त्यात महिलांचा सहभाग नगण्य. त्यामुळे महिला वर्गाबाबत ते अधिकच हळवे. नेमका त्याचा फायदा घेत मी यांना बोलते केले. त्यामुळे माहिती मिळवायला अजिबात त्रास झाला नाही. आपण राज्यकर्त्यांच्या वर्तुळातले. उच्चवर्णीय. त्यामुळे देश चालवण्याची जबाबदारी आपल्यावरच. आपल्याला कुणी हात लावू शकत नाही. आपणच संस्कृतीचे खरे वारसदार, अशी भावना मला त्यांच्यात दिसली. याच बेफिकिरीचा अचूक फायदा मी उचलला व पाहिजे ती माहिती त्यांच्याकडून अगदी सहजपणे मिळवली.’ सैनिकाचे हे मनोगत संपताच पुन्हा टाळय़ांचा गजर झाला. मग वरिष्ठांच्या हस्ते विशेष ‘रिवार्ड’ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. शेवटी संघटनेचे प्रमुख उभे राहिले. ‘वहा के धर्म के ऐसे लोगही आगे हमारे लक्ष्य होंगे. इतरांच्या तुलनेत यांना जाळय़ात अडकवणे सोपे हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे संघटनेच्या ‘हनी ट्रॅप’ विभागात महिलांऐवजी पुरुषांची संख्या वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे.’ प्रमुखांचे हे भाषण संपताच सभागृहात मध घातलेल्या चहाचा आस्वाद घ्यायला सारे सज्ज झाले.