डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास काही दिवस बाकी असताना, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हेदेखील येणाऱ्या काही कठीण वर्षांसाठी सज्ज होत आहेत. अधिक निर्बंधांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय बिघाड होण्याची अपेक्षा चीनला आहे. बीजिंगने या परिस्थितीला उत्तर म्हणून कठोर आणि सामंजस्यपूर्ण उपाययोजनांचे मिश्रण तयार ठेवल्याचे दिसते आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीला उपराष्ट्रपती हान झेंग यांना पाठवणे हा यापैकी सामंजस्याचा एक भाग. खरे तर, चीन किमान जून २०२० पासूनच अशा तणावाला तोंड देण्याची तयारी करत आहे. अलीकडच्या काळात चिनी नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये आणि चीनच्या अधिकृत माध्यमांमध्ये वक्तृत्वात लक्षणीय नरमपणा दिसून येत असला, तरी चिनी विश्लेषक आणि लष्करी विचारवंतांचे असे मत आहे की, चीनला खूप ताणलेल्या संबंधांचा सामना करावा लागेल. २०२४ च्या शेवटच्या दिवशी क्षी जिनपिंग यांनी ‘चिनी आधुनिकीकरणाचा प्रवास’ वाटतो तितका निर्वेध नसून या प्रवासात ‘खवळलेला दर्या आणि धोकादायक वादळे’देखील असतील, असे विधान चीनच्या सर्वोच्च कम्युनिस्ट नेतृत्वापुढे केले होते. त्यापूर्वीच चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लादले गेलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती. डिसेंबर २०२४ च्या सुरुवातीला चीनने तीन खनिजांच्या (गॅलियम, जर्मेनियम आणि अँटिमनी) अमेरिकेला निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली, त्याहीमुळे दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान व्यापार निर्बंध वाढलेच. ही तिन्ही खनिजे लष्करी उपयोगाची आहेत. याखेरीज गेल्या आठवड्यात चीनने लॉकहीड मार्टिन, रेथियन इत्यादींसह दहा अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध लादले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा