-केतन गजानन शिंदे
“जिथं मन नेहमी निर्भय असते अन् मान अभिमानाने ताठ उभी असते. जिथं ज्ञान सगळ्या बंधनाच्या पलीकडे मुक्त असतं” – रवींद्रनाथ टागोरांच्या या ओळी कवटाळून विद्यार्थी विश्वविद्यालयाच्या पायऱ्या चढून येतात. विश्वविद्यालय त्यांना एक ‘अवकाश’ प्रदान करतं. हा ‘अवकाश’ त्यांच्या स्वप्नांचा आविष्कार असतो. या एकूण ‘कल्पनेला’ प्रतिगामी शक्तींचा विरोध राहिला आहे. उघड विरोध काळाच्या ओघात सुप्त झाला असला तरी तो दडून राहत नाही. तो वेळोवेळी उफाळून येतो अन् कधी कधी किळसवाण्या रितीने हिंसक देखील होतो.

हैदराबाद विश्वविद्यालयात १७ एप्रिलच्या रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने दोन विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केला. अर्थशास्त्र विभागात विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभात सांप्रदायिक गाणी लावण्यावर या दोन विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता. विश्वविद्यालयात भिन्न धर्म, जात, पंथ एकत्र नांदतात, हे सौहार्द टिकून राहण्यासाठी हा आक्षेप रास्तच आहे पण धार्मिक उन्मादाने गंजून गेलेल्या समाजात असा आक्षेप असणे देखील तुमच्या जीवावर बेतू शकते. बचावासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली. महिला अन् दिव्यांग विद्यार्थी देखील त्याला अपवाद नव्हते. या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वविद्यालयांतील वाढत्या हिंसेवर व्यापक भाष्य करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या सामूहिक वाटचालीशी देखील जोडणे गरजेचे आहे.

आणखी वाचा-मतदार म्हणून आपल्याला काय हवं आहे?

विश्वविद्यालयांची कल्पना जे ‘स्वप्न’ साकार करू पाहते त्या स्वप्नाशी प्रतिगामी शक्तींची मुळातून फारकत आहे. जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा यांच्या भिंती जिथे ढासळतात तो विश्वविद्यालयाचा ‘अवकाश’ सामाजिक मुक्तीची वाटचाल करतो. तो देशाची जमीन नांगरून पुरोगामी विचार पेरत जातो. प्रतिगामी शक्तींचा तळतळाट नेमका या ठिकाणी आहे आणि विविध विश्वविद्यालयांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी आपली मागास, प्रतिगामी प्रवृत्ती दाखवून दिली आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी घडलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकरण असो किंवा हैदराबाद विश्वविद्यालयात नुकताच झालेला हल्ला. देशाच्या विविध भागात ही सततची आक्रमणे विशिष्ट जमावाकडून का होत राहतात? म्हणून हिंसेचे स्वरूप समजून घेताना सर्वप्रथम विश्वविद्यालयाची कल्पना समजून घेणे जरुरी ठरते.

शिक्षणाची चळवळ ही नेहमी मुक्तीची चळवळ राहिली आहे. ही मूलभूत उजळणी या ठिकाणी करणे गरजेचे ठरते. सार्वजनिक शिक्षणाच्या वाटा आज बंद झाल्या तर किती तरी उपेक्षित घटकांसाठी पुन्हा एकदा शिक्षण हे स्वप्नच उरेल. एका बाजूने धोरणात्मक रित्या सरकारचे सार्वजानिक शिक्षणावरील आक्रमण अन् दुसऱ्या बाजूने उरल्या सुरल्या ठिकाणी असे हल्ले घडवून विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा, त्यांच्यात भय निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन्ही गोष्टींना आगळे पाहता येणार नाही. हे सततचे हल्ले या देशातील सार्वजानिक शिक्षणावर रोखले असतात अन् त्यांना ‘राजकीय हेतू’ असतो हे देखील समजून घेतले पाहिजे.

आणखी वाचा-दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?

रोहित वेमुलाच्या दुर्दैवी निधनानंतर जी चळवळ उभी राहिली त्याची जननी म्हणजे हैदराबाद विश्वविद्यालय. आज पुन्हा तिथे झुंडशाही सोकावू लागली आहे. आज इथे विद्यार्थी निव्वळ त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत नाहीत. हा प्रश्न भावी पिढ्यांचा आहे. भविष्याचा आहे. मुक्त विचारविनिमय, तार्किक वातावरण अन् शैक्षणिक चळवळीचे टिकून राहणे देशाच्या जडणघडणीत आवश्यक आहे. या देशाच्या शैक्षणिक चळवळीला शेकडो वर्षांचा वारसा आहे. आजचे वर्तमान भूतकाळाच्या संघर्षाचा परिपाक आहे. फोफावलेली झुंडशाही हा वारसा गिळू पाहते. इतक्या व्यापक परिणामांचा विचार या अनुषंगाने आपल्याला करता यावा.

देशातल्या एक नामांकित विश्वविद्यालयात शेकडोंचा जमाव विद्यार्थ्यांवर हल्ला करतो अन् त्याचे पडसाद कुठेही उमटत नाहीत. राज्यकर्त्यांना, प्रसार माध्यमांना त्याचे भान नसते. विश्वविद्यालयीन प्रशासन मूग गिळून बसते. ही आपली सामूहिक वाटचाल आहे अन् हे आपले भविष्य आहे. सामान्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, शिक्षणासारख्या मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष करण्याचा शिरस्ता जुनाच आहे पण बदलत्या सत्ताकारणात ही आक्रमणे अधिक क्लिष्ट झाली आहेत, त्यांनी नवे स्वरूप धारण केले आहे. विवेकवाद्यांनी आज या आव्हानांना बळकट प्रतिकार उभा करण्याची आवश्यकता आहे कारण आजचा संघर्ष हा उगवत्या भविष्याशी संवाद आहे.

ketanips17@gmail.com