इष्टतमीकरण म्हणजे इंग्रजीत ऑप्टिमायझेशन. हे दोन्ही शब्द समजण्यास कठीण, पण ‘उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर’ हा त्याचा एक सोपा अर्थ, अर्थशास्त्राप्रमाणेच व्यवस्थापनालाही लागू पडणारा. चांगला अर्थशास्त्रज्ञ इष्टतमीकरण करतो, तसे ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’मधील विकास-अर्थशास्त्राचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक अशोक कोतवाल यांनीही आपल्या जगण्याचे इष्टतमीकरण केले आणि आजार बळावतो आहे, शरीर साथ देईनासे होईल, हे जाणून वयाच्या ७७ व्या वर्षी कॅनडामध्ये इच्छामरणाचा मार्ग पत्करला. कॅनडात हा मार्ग कायदेशीर आहे, त्यामुळे घरच्यांच्या सान्निध्यात, आप्तसुहृदांना संदेश पाठवून त्यांनी २८ एप्रिल रोजी इहलोक सोडला. त्यापूर्वी त्यांनी केलेले इष्टतमीकरण कशासंदर्भात होते? ११ जुलै १९४५ रोजी जन्मलेले अशोक यशवंत कोतवाल हे अभ्यासूपणापेक्षा हुशारीच्या बळावर मुंबईच्या ‘आयआयटी’तून १९६६ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर (बी. टेक्.) झाले. त्या काळात संगणकाची पूर्वरूपे आणणाऱ्या ‘आयबीएम’ या अमेरिकी कंपनीच्या मुंबई शाखेत नोकरी करून उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तिथेही एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत सिस्टिम्स इंजिनीअर म्हणून नोकरी करता करता एम.एस. झाले. पुढली नोकरी अधिक चांगली मिळाली, पण १९७५ साली या क्षेत्रापेक्षा निराळे काही करण्याचे त्यांनी ठरवले. सदानंद वर्दे (हे केवळ माजी मंत्री वा समाजवादी नेतेच नव्हेत तर अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते) यांचा प्रभाव बलवत्तर ठरला आणि इकडे भारतात ‘गरीबी हटाओ’चा नारा बुलंद असताना, त्यासाठी वीसकलमी कार्यक्रमाचे मृगजळ दाखवून आणीबाणी घोषित केली जात असताना अमेरिकेत अशोक कोतवाल यांनी ‘भारतातील गरिबीची समस्या समजून घेण्यासाठी’ बॉस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. १९८२ साली त्यांना अर्थशास्त्रातील ‘पीएच.डी.’ मिळाली, त्याआधीपासून ते अर्थशास्त्राचे व्याख्याते म्हणून कार्यरत झाले होते. कॅनडाच्या व्हँकूव्हर शहरातील ‘ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठा’त सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी दुसरे देशांतर केले. पुढे याच विद्यापीठात विभागप्रमुख (१९९५ ते २०००) आणि याच विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडिया अ‍ॅण्ड साउथ एशिया रिसर्च’चे संचालक (२००३- ०८) या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. पण पुढले वळण आले ते २०१२ मध्ये. १९९४ मध्येच त्यांचे ‘व्हाय पॉव्हर्टी पर्सिस्ट्स इन इंडिया’ हे पुस्तक (सहलेखक मुकेश ईश्वरन्) प्रकाशित झाले होते. पुढल्या १५-१६ वर्षांत कोतवाल यांनी अनेक शोधनिबंधच वाचले असे नव्हे, तर काही वृत्तपत्रांतूनही लेख लिहिले होते. या दोन्ही प्रकारच्या लिखाणाचे महत्त्व ते जाणत होते. किंबहुना, अर्थशास्त्रीय ज्ञान केवळ शोधनिबंध आणि विद्वज्जनांच्या चर्चेपुरते मर्यादित न राहता लोकांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा ध्यास वाढत होता. त्याला तंत्र आणि सहकाऱ्यांची, तसेच ‘इंटरनॅशनल ग्रोथ सेंटर’च्या पाठबळाची जोड मिळाल्याने संस्थात्मक रूप आले.. जुलै २०१२ मध्ये, ‘आयडियाज फॉर इंडिया.इन’ हे संकेतस्थळ सुरू झाले.. प्रा. अशोक कोतवाल हे त्याचे प्रमुख संपादक होते, अगदी अखेपर्यंत. ‘आयफोरआय’ अशा लघुनामाने ओळखल्या जाणाऱ्या या संकेतस्थळातून प्रा. कोतवाल यांच्या ध्यासाची ओळख होते. शेती, अन्नसुरक्षा, जागतिकीकरणात शेतमालाचे स्थान, पर्यायाने आयात-निर्यात धोरणांची समीक्षा अशा विषयांतील त्यांची गती इथल्या अनेक लेखांतून दिसतेच, पण संपादक म्हणून त्यांचा आवाकाही उमगतो. दहाव्या वर्षांत प्रवेश करताना ‘आयफोरआय’ने ७,५९,७१५ वाचक आणि एकंदर १४५५ लेखक जोडले होते. अर्थशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयोग प्रा. कोतवाल यांनी यशस्वी करून दाखवला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economics professor ashok kotwal profile zws
First published on: 30-04-2022 at 02:57 IST