हसमुख शाह

साक्षीदार म्हणून सारे पाहणे, जरूर तेथे सहभाग घेणे आणि त्या सहभागाचा परिणाम सर्वांच्या भल्यासाठीच असावा हे पथ्य पाळणे असे हसमुख शाह यांच्या बहुविध कारकीर्दीचे सूत्र सांगता येईल

hasmukh shah profile
हसमुख शाह

साक्षीदार म्हणून सारे पाहणे, जरूर तेथे सहभाग घेणे आणि त्या सहभागाचा परिणाम सर्वांच्या भल्यासाठीच असावा हे पथ्य पाळणे असे हसमुख शाह यांच्या बहुविध कारकीर्दीचे सूत्र सांगता येईल.  हे सूत्र प्रथमदर्शनी साधेच वाटले तरी हसमुख शाह यांच्या कारकीर्दीचे तपशील पाहिल्यास याचे पालन किती कठीण होते, हे लक्षात येईल. ‘आयपीसीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि खासगीकरण झालेल्या पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व पुढे अध्यक्ष, मोरारजी देसाई व चरणसिंह यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयातील विशेषाधिकारी,  ‘गुजरात इकॉलॉजी कमिशन’चे पहिले अध्यक्ष, सुमारे ३० कंपन्यांचे संचालक व अन्य काहींचे सल्लागार, राष्ट्रीय अभिकल्प संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन- एनआयडी) तसेच आयआयटी- मुंबईच्या संचालक मंडळांचे सदस्य, ‘दर्शक इतिहास निधी’ स्थापून गुजरातच्या सागरी इतिहासाच्या संशोधनाला चालना देण्यापासून ते ‘गुजरात इकॉलॉजिकल सोसायटी’ ही स्वायत्त संस्था स्थापून तिच्यामार्फत परिसंस्था-शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करणारे कल्पक सामाजिक नेते … हे सारे, त्या कारकीर्दीचे काही पैलू. 

या हसमुख शहांचे निधन ३ डिसेंबर रोजी, वयाच्या ८९ व्या वर्षी झाले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असूनही १२ नोव्हेंबरपासून ते करोनाग्रस्त झाले होते. कोविडोत्तर प्रकृतीअस्वास्थ्य बळावल्याने ते दगावले.

‘दीठुं माई’ या २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या गुजराती आत्मपर पुस्तकात  त्यांनी ज्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत; त्यांतूनही त्यांची साक्षीवृत्ती दिसून येते. मोरारजींच्या विमानाला झालेला अपघात, आंतरराष्ट्रीय पेचांवर ‘जनता’ सरकारची भूमिका आदी अवघड विषयांचे निवेदन त्यांनी प्रांजळपणे केले आहे.  समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, ईशान्य भारतीय जमातींचा पीएच.डी. साठी अभ्यास, ‘आयपीसीएल’मध्ये अधिकारी म्हणून (केवळ द्विपदवीधर असल्याने) निवड, हा तपशील त्यात त्रोटकपणे येतो; तसेच गेल्या २० वर्षांत त्यांनी उभारलेल्या विविधांगी समाजकार्याबद्दलही ते या पुस्तकात कमीच लिहितात.  गुजरात हीच त्यांची कर्मभूमी आणि हे राज्य हा त्यांचा अस्मिताबिंदूही होता, पण तोंडाळ अस्मितादर्शनापासून ते नेहमीच दूर राहिले. त्यामुळे असेल, पण  त्यांना आदरांजली वाहण्याच्या मिषाने स्वत:चे गुजरातप्रेम पाजळण्याची संधी शोधणारे लोक कमी होते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hasmukh shah profile abn

Next Story
अ‍ॅडमिरल आर. हरि कुमार
फोटो गॅलरी