व्यक्तिवेध : डॉ. एस. सोमनाथ

डॉ. एस. सोमनाथ हे आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे- म्हणजे ‘इस्रो’चे दहावे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत.

डॉ. एस. सोमनाथ

भारताच्या अवकाश-आकांक्षांना नवे धुमारे १९८०च्या दशकानंतर फुटले, ते ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपण-यान’ (पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल- पीएसएलव्ही) आणि ‘भूसंकालिक उपग्रह प्रक्षेपण-यान’ (जिओसिंक्रॉनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल-  जीएसएलव्ही) हे दोन्ही प्रकल्प भारतीय शास्त्रज्ञांनी अन्य देशांची मदत न घेता यशस्वी करण्याचे  ठरवल्यामुळे! त्या वेळी तरुण असलेले, ‘पीएसएलव्ही’ प्रकल्पाचे प्रमुख म्हणून तेव्हा नुकतीच नेमणूक झालेले डॉ. एस. सोमनाथ हे आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे- म्हणजे ‘इस्रो’चे दहावे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. ‘पीएसएलव्ही’च्या ११ खेपा, तर ‘जीएसएलएव्ही’च्या तीन खेपा त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या होत्या. अर्थात, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचे स्वरूप हे केवळ तेवढय़ा एका खेपेचीच आखणी आणि अमलबजावणी असे होते. १९९४ मध्ये ऐन क्षणमोजणी सुरू झाली असताना पीएसएलव्ही क्षेपकामधील एक दोष हुडकून, तो मार्गीही लावल्यामुळे त्यांच्या तांत्रिक ज्ञानाची वाहवा झाली होती. पुढील काही वर्षांत, इस्रो तसेच विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रातील तरुण शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारे, असा त्यांचा लौकिक झाला. आता ‘इस्रो’चे चेअरमन म्हणून त्यांच्या या साऱ्याच नेतृत्वगुणांचा खरा कस लागेल. केरळच्या आलपुळा (अलेप्पी) जिल्ह्यात जन्मलेल्या सोमनाथ यांचे वडील हिंदीचे अध्यापक होते. मुलाच्या अभियांत्रिकीच्या आवडीला त्यांनी वाव दिला. तिरुवनंतपुरम येथे अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेतानाच, रॉकेट- प्रणोदन (प्रॉपल्शन) विषयक लघु-अभ्यासक्रमही सोमनाथ पूर्ण करू शकले. बेंगळूरुच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेत  विमानशास्त्र- अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी ते दाखल झाले. तेथून विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रासाठी त्यांची निवड  झाली आणि १९८५ पासून ते उपग्रह प्रक्षेपक प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करू लागले आणि प्रकल्पातील पथक-प्रमुखापासून, २०१० मध्ये ‘प्रकल्प संचालक’ या पदापर्यंत पोहोचले. २०१५ मध्ये या उपग्रह-प्रक्षेपक यानांच्या इंजिनांवर संशोधन करणाऱ्या द्रव-प्रणोदन प्रणाली केंद्र (लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम्स सेंटर) या विशेष संशोधन संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि जून २०१८ पासून ‘विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रा’चे ते प्रमुख संचालक झाले, तेव्हाही त्यांनी के. शिवन यांच्याकडूनच सूत्रे स्वीकारली होती. आता त्याच शिवन यांच्याकडून ते ‘इस्रो’ची सूत्रे स्वीकारत आहेत. चांद्रयान-३, एक्स्पोसॅट, आदित्य-एल१ अशा नव्या मोहिमा याच वर्षांत त्यांची वाट पाहात आहेत!

मराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information about new isro chief dr s somnath zws

Next Story
रिचर्ड लिकी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी