व्यक्तिवेध : अली पीटर जॉन

अनुपम खेर यांच्यापासून मनोज वाजपेयीपर्यंत अनेकांचा धडपडीचा काळ अली यांचे बोट धरूनच यशात रूपांतरित झाला.

अली पीटर जॉन यांचे आयुष्य त्यांनी ज्यावर आयुष्यभर प्रेम केले त्या व्यावसायिक हिंदी चित्रपटाच्या नायकासारखेच काही काळ होते. मुंबईतल्या झोपडपट्टीत विधवा आईने वाढवलेला हा मुलगा. आयुष्याकडून फार अपेक्षा नसलेला. दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या या चाहत्याने एकदा सहज त्यांना पत्र लिहिले. त्या एका पोस्टकार्डने त्यांचे आयुष्य बदलले. के. ए. अब्बास यांनी या तरुणातला लेखक हुडकून काढला. या लेखनाच्याच बळावर अली यांनी १९६९ ते २००७ अशी ३८ वर्षे ‘स्क्रीन’ साप्ताहिकासाठी पत्रकारिता केली. दिलीपकुमारपासून कार्तिक आर्यनपर्यंतच्या अनेक पिढय़ा घडताना त्यांनी पाहिल्या. चित्रपटातले तारे खरोखरच खूप दूर होते तेव्हापासून ते आज जनसंपर्क अधिकाऱ्यांची फौज बाळगून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा करू लागले तेव्हापर्यंतच्या काळात चित्रपटसृष्टी आणि पत्रकारितेच्या स्वरूपात झालेल्या आमूलाग्र बदलाचे ते साक्षीदार होते. ‘स्क्रीन’मधील ‘अलीज नोट्स’ हे त्यांचे सदर लोकप्रिय होते. संपकसाधने कमी असतानाच्या त्या काळात त्यांनी सातत्याने प्रवास करून सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या जगातल्या अनेक रंजक गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. सहकाऱ्यांमध्ये मितभाषी म्हणून ओळखले जाणारे अली चित्रपटाच्या वर्तुळात मात्र प्रचंड लोकप्रिय होते. ‘माय देव- मेमरीज ऑफ अ‍ॅन इम्मॉर्टल मॅन’, ‘मुन्ना- द बॉय हू ग्र्यू इन्टू अ लीजन्ड’, ‘विटनेसिंग वंडर्स’, ‘लव्ह लेटर्स फ्रॉम लेजेन्ड्स टू अ व्हेगाबाँड’ अशा अनेक पुस्तकांतून त्यांनी चित्रपटप्रेमींना ताऱ्यांच्या जगाची झलक दाखविली. त्यांनी केवळ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक यांच्याविषयीच नाही, तर चित्रपटातल्या ताऱ्यांची घरे, त्यांचे बाऊन्सर्स, स्ट्रगलर्सच्या आयुष्यातली आव्हाने अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले. अली उत्कृष्ट कथनकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या भूतकाळातील अनेक सुरस कथांचा खजिना त्यांनी जपला. अनुपम खेर यांच्यापासून मनोज वाजपेयीपर्यंत अनेकांचा धडपडीचा काळ अली यांचे बोट धरूनच यशात रूपांतरित झाला. अली यांचे व्यक्तिगत आयुष्य मात्र अनेक समस्यांनी वेढलेलेच राहिले.

‘ALI( VE)  In Bits And Pieces’ या आत्मचरित्रात त्यांनी त्यांची जडणघडण आणि पत्रकारिता करताना आलेले अनुभव मांडले आहेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी केले होते. स्क्रीनमधून निवृत्त झाल्यानंतरही अली यांच्या लेखनात खंड पडला नाही. मृत्यूच्या काही दिवस आधीपर्यंत  किमान इंटरनेटवर तरी त्यांचे लेखन सुरूच राहिले. ‘मायापुरी’ या हिंदी नियतकालिकासाठीही ते लिहीत.  देशातील बदलत्या राजकीय, सामाजिक स्थितीवर त्यांनी अनेकदा परखड भाष्य केले.  ‘१९४७ मध्ये एक फाळणी झाली होती, आज २०२२ मध्ये देशाच्या किती फाळण्या केल्या जात आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली होती.  अखेपर्यंत लिहिते राहिलेल्या अली यांना मृत्यूची चाहूल लागली असावी. मृत्यूच्या सहा दिवस आधी त्यांनी त्याविषयी समाजमाध्यमावर लिहिले होते. स्ट्रगलर्ससाठी ते चित्रपटसृष्टीशी जोडणारा दुवा होते तर ज्येष्ठ अभिनेत्यांसाठी आठवणींचा पेटारा आणि रसिकांसाठी या अजब दुनियेचे दर्शन घडवणारी खिडकी. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील गेल्या अर्धशतकातील घडामोडींचा बृहत्कोष कायमचा बंद झाला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Veteran film journalist ali peter john remembering ali peter john zws

Next Story
व्यक्तिवेध : भजन सोपोरी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी