लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : ठाण्यातील क्रेडाई-एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात चार दिवस भरविण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाला २९ हजार १६३ नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनात २१४ ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या तर, या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे ७४५ कोटी रुपयांच्या गृह कर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रदर्शन कालावधी लागू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेलाही अनेक महिलांनी प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.

ठाण्यातील क्रेडाई-एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ठाणे शहर तसेच परिसरातील ४० हून अधिक प्रसिद्ध विकसकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टॉल प्रदर्शनात मांडले होते. याशिवाय, १० हून अधिक राष्ट्रीयीकृत बँका आणि गृह वित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते.

या प्रदर्शनात ३० लाखांपासून ते ३ कोटींपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. याठिकाणी कार्यालयांच्या वास्तुचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या प्रदर्शनाला २९ हजार १६३ नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. सदनिका आणि कार्यालय खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी २१४ ग्राहकांनी सदनिका खरेदी केली आहे. या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे ७४५ कोटी रुपयांच्या गृह कर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.

ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोचता आले, याचा आनंद वाटत असल्याचे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले. या प्रदर्शनात अनेक वैशिष्टयपूर्ण, उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनाला भेट देऊ शकलेले नाहीत, अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून http://www.credaimchi.com या वेबसाईटवर प्रदर्शन पाहावे, असे सचिव मनिष खंडेलवाल यांनी सांगितले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना स्वप्नातील घर मिळवून देऊ शकलो, याचा आनंद वाटतो. घरखरेदीसाठी इच्छूकांनी चांगला प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून घरखरेदीसाठी इच्छूक शेकडो नागरिकांनी घरांची माहिती घेतली असून, ते लवकरच घर पसंत करतील. या प्रदर्शनाला भेट देणे शक्य झालेले नाही अशा नागरिकांना क्रेडाई-एमसीएचआयच्या वेबसाईटवर पुढील ३ महिने प्रदर्शन पाहता येईल. -जितेंद्र मेहता, अध्यक्ष – क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे

यंदा ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह बॅण्ड कम्युनिकेटर ऑफ द इयर’ म्हणून रुस्तमजी ग्रूपला, बेस्ट डेब्यूट स्टॉलसाठी एल ॲण्ड टी रिॲलिटी, बेस्ट एचएफसी स्टॉल म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रला प्रथम, तर यूनियन बँक ऑफ इंडियाला द्वितीय पुरस्कार देण्यात आला. बेस्ट कन्झ्युमर अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहम हौसिंग फायनान्सला गौरविण्यात आले. तर नारंग रिॲलिटी ॲण्ड कोर्टयार्ड रिअल इस्टेट यांनी बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल म्हणून बाजी मारली. बेस्ट डिझाईन स्टॉलसाठी प्रथम क्रमांक विहंग ग्रूप आणि द्वितीय क्रमांक एकत्व ग्रुपला मिळाला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 214 flats sold at thane property exhibition mrj