कल्याण- गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी संस्थांनी एकत्रितपणे विसर्जन घाट, घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकूण चार टन निर्माल्य जमा केले आहे. हे निर्माल्य ओला, सुका पध्दतीने विलग करुन खत करण्यासाठी स्थानिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उरणमध्ये स्वच्छता अभियानाचा एक दिवस एक तासा पुरताच ठरला; गांधी जयंतीला पुन्हा कचरा रस्त्यावरच

कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभागाचे कर्मचारी, पर्यावरण दक्षता मंडळ, निर्मल युथ फाऊंडेशन आणि पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून पालिकेने शहराच्या विविध भागात, गणपती विसर्जन स्थळी निर्माल्य कलश तयार केले होते. खाडीत गणपती विसर्जन करण्यापूर्वी स्वयंसेवक गणपतीवरील फुलांचे हार काढून घेत होते. हे निर्माल्य वेगळे करुन ते कक्षात टाकले जातात. शहरातील कृत्रिम तलावांच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. डोंबिवली, टिटवाळा भागात २० ठिकाणी ४२५ स्वयंसेवक गणेश भक्तांजवळील निर्माल्य संकलनासाठी तैनात होते. डोंबिवली, टिटवाळा भागात २२ हजार किलो निर्माल्य जमा करण्यात आले. कल्याणमध्ये १८ हजार किलो निर्माल्य जमा करण्यात आले. याशिवाय नैसर्गिक, कृत्रिम तलावांवर निर्माल्य जमा करण्यात आले. डोंबिवलीत ओला, सुका पध्दतीने निर्माल्य विलगीकरणाची प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये सात हजार ९५० किलो सुके निर्माल्य होते. हे निर्माल्य ओला, सुका पध्दतीने विलग करुन डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या एमआयडीसीतील निर्माल्य खत प्रकल्पासाठी देण्यात आले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : हरवलेले आजोबा जेष्ठ नागरिक दिनी कुटुंबीयात परतले; स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांची मोलाची मदत

गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टिक पिशव्या, फुले, दोरे नदीत, खाडीत गणपती बरोबर यापूर्वी विसर्जित केले जात होते. त्यामुळे जलप्रदूषण होत होते. हे टाळण्यासाठी मागील काही वर्षापासून शासन आदेशावरुन गणपती विसर्जनापूर्वी निर्माल्य काढून घेण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशाची प्रभावीपणे कल्याण डोंबिवलीत अंमलबजावणी केली जात आहे. डोंबिवलीत मिलापनगर कृत्रिम तलाव, चोळे तलाव, पंचायत बावडी, मंजुनाथ महाविद्यालय, टिटवाळा येथे काळू नदी गणेश घाट, वासुंद्री गाव, रुंदे गणेश घाट, जुनी डोंबिवलीतील रेतीबंदर, सातपूल जेट्टी, कोपर तलाव, गणेशनगर घाट, कल्याणमध्ये दुर्गाडी गणेश घाट, गांधारी घाट, उंबर्डे तलाव, चिंचपाडा, काटेमानिवली भागातील नैसर्गिक, कृत्रिम तलावांवर निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला.  आता नागरिकही पर्यावरणाविषयी जागृत झाले आहेत. बहुतांशी गणेश भक्त कापडी, कागदी पिशवीत निर्माल्य घेऊन येतात. त्यामुळे निर्माल्य जमा करणे सहज सोपे होते, असे कचरा संकलन करणाऱ्या स्वयंसेवकांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 tonnes of nirmalaya collected during ganeshotsav in kalyan dombivli zws