ठाणे : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष इंद्रधनुष्य मोहिमेत प्रत्येक आरोग्यकेंद्रात सहा कामकाजाच्या दिवसांमध्ये ७७९ अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच महापालिका क्षेत्रात संपूर्ण लसीकरणाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचे ध्येय पालिकेने निश्चित केले आहे. या मोहिमेत ५ वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरात विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येणार असून त्यात ५ वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात या मोहिमेला ७ ऑगस्टपासून सुरूवात झाली असून ही मोहीम १२ ऑगस्टपर्यत सुरू राहणार आहे. ही मोहीम महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते ४ या वेळेत सुरू राहणार असून येथे सर्व लसी मोफत दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

हेही वाचा – ठाण्यात अवजड वाहतूकीत घट पण घुसखोरी मात्र सुरूच

या मोहिमेसाठी अतिजोखमीच्या क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन ५ वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या भागामध्ये झोपडपट्ट्या, इमारत बांधकाम ठिकाणे, वीट भट्ट्या, पोलिओचे अति जोखमीचे भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत कमी प्रतिसाद मिळणारे विभाग, याठिकाणी सर्वेक्षण करून ५ वर्षे वयोगटातील बालके व गर्भवती मातांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. महापालिका क्षेत्रात अद्यापपर्यंत ५ वर्षे वयोगटातील ७ हजार ७३६ बालकांचे आणि १ हजार ४८१ गर्भवती मातांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी दिली. मोहिमेत प्रत्येक आरोग्यकेंद्रात सहा कामकाजाच्या दिवसांमध्ये ७७९ अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच महापालिका क्षेत्रात संपूर्ण लसीकरणाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचे ध्येय पालिकेने निश्चित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाण्यात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची विशेष मोहीम राबविताना लसीकरणानंतर बाळाला ताप येणे, इंजेक्शनच्या जागी गाठ येणे असे प्रकार घडतात. लसींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाण अत्यंत किरकोळ असून या कारणांसाठी आपल्या बाळाला लस न देणे हे योग्य नाही. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लसी बालकांचे क्षयरोग, काविळ, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, गोवर, हिमोफिलस, इन्फल्युएंझा बी या जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करीत असून बाळाला लसीकरणापासून वंचित ठेवू नये, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiming to increase vaccination coverage to more than 90 percent in thane special rainbow campaign launched ssb