शहापूरातील भाविकाची आयसीएमआरमध्ये निवड

आई कर्करोगाने ग्रस्त असतानाही भाविकाने मुलाखत दिली आणि तिची साहाय्यक वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याची माहिती तिचे वडिल मोरेश्वर उमवणे यांनी दिली

ठाणे : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वैज्ञानिक पदाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या शहापुरातील डॉ. भाविका मोरेश्वर उमवणे या तरुणीची “भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेत (आयसीएमआर) या संस्थेत साहाय्यक वैज्ञानिक पदासाठी निवड झाली आहे. सर्वसामान्य कुटूंबातील भविकाच्या या उत्तुंग यशाबद्दल ठाणे जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

शहापूर पासून ३५ किलोमीटर अंतरावरील साखरपाडा या गावात डॉ. भाविका उमवणे ही राहते. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण अर्चना इंग्रजी शाळेत झाले. त्यानंतर तिचे ११ वी आणि बारावीचे शिक्षण खाडे महाविद्यालयात झाले. वडिल मोरेश्वर हे जिल्हा परिषदेच्या शहापूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. त्यामुळे सुरूवातीपासूनच स्पर्धा परिक्षेचा सराव भाविकाने सुरू केला होता. नीटची परिक्षा दिल्यानंतर २०१९ मध्ये भाविकाने तिचे पदवीचे शिक्षण नगरमधील एका महाविद्यालयात पूर्ण केले. तर २०२० मध्ये लोकसेवा आयोगाच्या वैज्ञानिक पदाची परीक्षा दिली होती. यामध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. अत्यंत दुर्गम भागातून शिक्षण पूर्ण केल्यामुळे तिचे संपूर्ण शहापूरमध्ये कौतुक केले जात आहे. आता तिची आता आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील संस्थेत साहाय्यक वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही भविकाची अमेरिका व जपान येथे संशोधनासाठी निवड झाली होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे विदेशात जाणे शक्य झाले नसल्याचे भाविकाचे वडील मोरेश्वर उमवणे यांनी सांगितले.

भाविकाच्या आईला फेब्रुवारी महिन्यात कर्करोग झाले होती. आई कर्करोगाने ग्रस्त असतानाही तिने मुलाखत दिली आणि तिची साहाय्यक वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याची माहिती मोरेश्वर उमवणे यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhavika from shahapur selected in icmr asj

Next Story
डोंबिवलीत चोरी करताना चोरट्याचा आठव्या माळयावरून पडून मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी