बदलापूर : कुळगाव बदलापूर शहरात २००६ साली मंजूर झालेली आणि तब्बल १६ वर्षांनंतरही प्रलंबित असलेली ‘बीएसयूपी’ योजनेच्या घरे वाटपासाठी पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने नुकतीच १२२ लाभार्थीची यादी जाहीर केली असून त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. सुनावणीनंतर अंतिम यादी जाहीर करून पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीएसयूपी योजनेच्या घरांचा मार्ग मोकळा होणार आहे.
‘बेसिक सव्‍‌र्हिसेस टू अर्बन पूअर’ असे योजनेचे नाव आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहरात झोपडपट्टी स्थलांतरण, रस्ते आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना घरांचा पर्याय देण्यासाठी बीएसयूपी योजना राबवण्यात आली होती. केंद्र शासनाने २००५ साली या योजनेची घोषणा केली होती. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांनाही २००६ साली यात समाविष्ट करून घेण्यात आले. मात्र अंबरनाथ शहरात लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे योजना अमलात येऊ शकली नाही. बदलापूर योजनेच्या चार वर्षांनी सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. २०१० साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर शहरात १ हजार ६३४ घरे मंजूर करण्यात आली होती. यात म्हाडा परिसर आणि सोनिवली येथे दोन टप्प्यांत या घरांची उभारणी करण्यात आली. म्हाडा वसाहतीतील घरांचे वाटप झाले असले तरी सोनिवली येथील घरे गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. २०१८ या वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपोषणानंतर तत्कालीन मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी डिसेंबर महिन्यात २२७ लाभार्थीची यादी जाहीर केली. मात्र लाभार्थीच्या वाटय़ाला येणारी ठरावीक रक्कम भरली गेली नसल्याने घरवाटप पुन्हा रखडले. दरम्यान २०२० पासून कोविडच्या उपचारादरम्यान याच घरांची मोठी मदत झाली. आता पालिका प्रशासनाने पुन्हा या घरांच्या वाटपासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने नुकतीच सोनिवली येथील सुमारे ५०० घरांच्या वाटपासाठी १२२ लाभार्थीची यादी जाहीर केली आहे. या यादीतील लाभार्थ्यांबाबत काही आक्षेप असल्यास येत्या आठ दिवसांत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यानंतर यादीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

बीएसयूपी घरांचा करोना संकटात वापर
एखाद्या रखडलेल्या योजनेमुळे सर्वसामान्यांना अडचणींनाच सामोरे जावे लागते. मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे १६ वर्षे रखडलेल्या बीएसयूपी योजनेतील घरे करोनाच्या संकटात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आणि विलगीकरणासाठी कामी आली. इतर शहरांना रुग्णालयांसाठी जागा शोधावी लागत होती. सोनिवली येथील ३१ इमारतींमधील ६०० घरे तयार असून त्यातील २४ इमारतींमधील घरे वापरली होती.


बीएसयूपी घरांच्या वाटपाचा प्रश्न प्रलंबित होता. आता १२२ लाभार्थीची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यावरील सूचना आणि हरकतींचा निपटारा केल्यानंतर अंतिम यादी प्रकाशित करून लाभार्थ्यांना घरे दिली जातील.-योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsup houses distribution beneficiaries announced approval scheme kulgaon badlapur municipality amy