रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी ११४ कोटींचे ‘वळण’
मध्य रेल्वेवरील पाचव्या व सहाव्या मार्गिकेची उभारणी करताना प्रवासी सुरक्षेचा विचार करून मुंब्रा येथील पारसिक बोगद्यालगत दुसरा बोगदा उभारण्याचा प्रकल्प रेल्वेने अखेर गुंडाळला. त्याऐवजी कळव्याच्या दिशेने नव्याने बांधण्यात आलेल्या बोगद्यातून मार्गिका थेट कळवा रेतीबंदरच्या दिशेने उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचीही उभारणी करण्यात येणार असून या कामासाठी रेल्वेच्या तिजोरीवर ११४ कोटींचा भार पडणार आहे.
मुंब्रा रेती बंदर ते स्थानकापर्यंत कळवा-मुंब्रा या दोन रेल्वे स्थानकांमधील रेती बंदर भागात कळव्याच्या दिशेने जुन्या बोगद्याशेजारी नवा बोगदा तयार करण्यात आला आहे. त्याच्या पुढे काही अंतरावर मुंब्रा रोडखालील शेजारीही आणखी एक बोगदा तयार करून ही मार्गिका जाणार होती. मात्र, मुंब््रय़ाच्या दिशेने असलेल्या या बोगद्याच्या शेजारी नवा बोगदा बांधल्यास भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मुळातच पुढे असलेल्या पारसिक बोगद्याची अवस्था फार काही चांगली नाही. याच भागात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे आणि झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. त्यामुळे लहान मुंब्रा बोगद्यालगत आणखी एक बोगदा तयार करण्याचा नाद रेल्वे प्रशासनाने अखेर सोडून दिला आहे. प्रशासनाने नव्याने आखलेल्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून या प्रकल्पासाठी जमीन सपाट करण्याचे कामही सुरू आहे. यापूर्वीचा मार्ग आखणीसाठी रेल्वे प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी बराचसा वेळ खर्च तर झालाच, शिवाय काही झोपडपट्टीधारकांचे पक्क्य़ा घरांमध्ये पुनर्वसनही करण्यात आले. इतका सगळा द्राविडी प्राणायाम केल्यानंतर मूळ मार्गच बदलण्यात आल्याने रेल्वे नियोजनाचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुंब्रा रोडवर उड्डाणपूल बांधून ११४ कोटी रुपयांचे हा वळण घेण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.
मंजुऱ्यांचे आव्हान
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) दुसऱ्या टप्प्यातील दिवा-ठाणे पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ठाण्याजवळ तयार होणारी कोंडी फोडण्यासाठी ठाणे-दिवा यादरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्यात येत आहे. या मार्गिकेमुळे सुमारे ४३ लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने हा प्रकल्प २०१९ ला पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असताना मूळ मार्गात आता बदल करण्यात आले आहेत. या कामासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने निविदाही काढली आहे. मात्र, दोन वेळा निविदा काढूनही या कामात कंत्राटदारांनी रस दाखवलेला नाही.