कल्याण : मागील दोन वर्ष वाहन कोंडीमुक्त असलेला शिळफाटा रस्ता मेट्रोची कामे सुरू झाल्यापासून दररोज वाहन कोंडीत अडकत आहे. प्रवासी आणि परिसरातील गावांमधील नागरिक या कोंडीने मेटाकुटीला आले आहेत. या कोंडीमुळे वाहतूक पोलिसांचे फुकटचे हाल होत आहेत. या कोंडीला मेट्रो कामातील सत्ताधाऱ्यांची, अधिकाऱ्यांची टक्केवारी हे मुख्य कारण आहे. बाकी दुसरे कोणतेच कारण नाही, अशी टीका मनसचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

मागील दोन वर्षापासून मेट्रो कामामुळे शिळफाटा रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडी विषयी आपण सतत एमएसआरडीसी, एमएमआरडीए, मेट्रो अधिकारी यांच्याशी बोलत आहोत. याविषयी कोणी काहीच बोलत नाहीत. कारण मेट्रोच्या कामामध्ये सत्ताधाऱ्यांबरोबर सगळ्यांनीच हात धुऊन घेतले आहेत. शिळफाटा रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे याविषयी कोणी अधिकारी, सत्ताधारी याविषयी बोलण्यास तयार नाही, अशी माहिती माजी आमदार राजू पाटील यांनी माध्यमांना दिली.

कल्याण तळोजा रस्त्यावरील मेट्रो मार्गातील रस्त्याचे अद्याप भूसंपादन झालेले नाही. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा किती मोबदला मिळेल हे नक्की नाही. शेतकरी मोबदला मिळाल्याशिवाय एक इंच जमीन मेट्रोसाठी देण्यास तयार नाहीत. मग शिळफाटा रस्त्यावर मागील वर्षापासून मेट्रोच्या कामांची का घाई केली जात आहे. ही कामे पहिले तळोजापासून वर्दळ नसलेल्या मोकळ्या भागात सुरू करा. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे सुरू करा, असे आपण सतत सांगत आहोत. त्याची कोणी दखल घेत नाही. या प्रकरणात सगळ्यांचे चांगलेच मुखलेपन झाले आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली.

शिळफाटा रस्त्यावर मेट्रो कामे सुरू करण्यापूर्वी या रस्त्याला काही पर्यायी रस्ते मार्ग मेट्रो कंपनीने एमएसआरडीसी, एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे आवश्यक होते. अशी कोणतीची सुविधा न देता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे सुरू केल्याने २४ तास हा रस्ता कोंडीत अडकलेला असतो. या कोंडीत वाहतूक पोलिसांची काहीही चूक नाही. उलट या कोंडीमुळे वाहतूक पोलीस फुकटचे कामाला लागले आहेत. मेट्रो कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी दहा फुटाचा भाग दोन्ही बाजुने बंद केला होता. मुख्य रस्त्यावर एक वाहन जाईल एवढीच जागा शिल्लक राहते. हे कोंडी करणारे मेट्रोचे पत्रे वाहतूक पोलिसांनी एकदा जेसीबी लावून तोडून टाकले होते, अशी माहिती पाटील यांनी दिली.

परप्रांतीय हाकला

वेगवेगळ्या भागातून अनेक परप्रांतीय आपल्या भागात येऊन राहत आहेत. यांचा अनावश्यक भार आपले रस्ते, वीज, पाणी आणि सर्वच नागरी सुविधांंवर पडत आहे. त्यामुळे विविध परप्रातांमधून आलेल्या नागरिकांना पहिले आपल्या भागातून हाकलून लावले पाहिजे. मूलभूत सुविधांचा विचार करून मनसेने अशी भूमिका घेतली की त्यांना प्रांतवादी ठरविले जाते. त्यामागचा उद्देश कोणी समजून घेत नाही, त्याला राजकीय रंग दिला जातो, असे राजू पाटील यांनी सांंगितले.