डोंबिवली स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा  

फेरीवाले मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करत आहेत.

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, पदपथांना सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाल्यांचा पादचाऱ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन दोन महिन्यांपूर्वी मनसेच्या डोंबिवली शाखेने फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली नाही तर, मनसे स्टाइल कारवाई करण्याचा इशारा दिला होता. आता फेरीवाले मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करत आहेत.  मनसे पदाधिकारी गुपचिळी धरून असल्याने पाणी मुरतंय कोठे असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व, पश्चिम भागांतील फेरीवाले हटविले आहेत. डोंबिवली पूर्वेतील फेरीवाले हटविण्यात फ, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना अपयश का येत आहे, असा प्रश्न पादचारी उपस्थित करत आहेत.

नेहरू रस्ता, चिमणीगल्ली, पाटकर रस्ता, डॉ. रॉथ रस्ता, कामत मेडिकल पदपथ, रामनगर, राजाजी रस्ता, मानपाडा रस्ता परिसर, फडके रस्ता येथे मुंब्रा, भायखळा, मस्जिद बंदर, अंधेरी येथून आलेले फेरीवाले व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने रहिवाशांनी मनसेशी संपर्क साधून फेरीवाल्यांविषयी आक्रमक भूमिका घेण्याची मागणी केली होती.

मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या फेरीवाल्यांना शिवसेना डोंबिवली शाखेतून आशीर्वाद मिळत आहे, म्हणून ते हटत नाहीत, असा आरोप करत मनोज घरत यांनी डोंबिवली फ प्रभागातील एक कर्मचारी शिवसेना शाखेतील एका पदाधिकाऱ्याशी निगडित आहे. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेला पहिली मुदत दिली जाईल. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन फ प्रभागात ठाण मांडून बसलेल्या एका कामगाराच्या बदलीची मागणी केली जाणार आहे, असे घरत यांनी सांगितले होते.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे गरेजेचे आहे. जागेचा प्रश्न सुटला तर फेरीवाला विषय संपुष्टात येईल. फेरीवाला हटाव पथकातील कामगार वाढविण्याचा विचार करतोय.

राजेश सावंत , साहाय्यक आयुक्त, , ग प्रभाग, डोंबिवली

रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात एकही फेरीवाला बसता कामा नये याची अंमलबजावणी अधिकारी करत आहेत. १५० मीटरच्या आत फेरीवाले दिसले तर कोणीही सांगावे मनसे त्याविषयी आक्रमक भूमिका घेईल.

मनोज घरतशहराध्यक्ष, मनसे, डोंबिवली

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hawkers encroachment near dombivli railway station zws

Next Story
कल्याण डोंबिवलीतील ‘झोपु’ योजनेच्या घरांवरील ५०० कोटीचा बोजा माफ ; साडे तीन हजार घरे वाटप करण्याचा मार्ग मोकळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी