कचरा प्रकल्पाच्या विलंबाविषयी कडोंमपातील अधिकाऱ्यांची महापौरांकडून कानउघाडणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या सात ते आठ वर्षांपासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या पालिकेला केंद्र शासनाच्या स्वच्छता सव्‍‌र्हेक्षणात २३४ वा क्रमांक मिळाला. त्यामुळे संतप्त महापौर राजेंद्र देवळेकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात त्यांच्यावर कचरा प्रकल्प साकारण्याबाबत होणाऱ्या विलंबाविषयी जाब विचारला. येत्या महिनाभरात कचऱ्याची समस्या कायमची मिटली पाहिजे, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, पालिका हद्दीत घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी दोन वर्षांत दोन ते तीन ठेकेदार आले होते. या ठेकेदारांकडे काही बडे नेते टक्केवारीचे मोठे जाळे टाकत आहेत. अलीकडेच एक ठेकेदार स्वत:हून पालिकेत घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी पुढे आला होता. या ठेकेदाराला ठाण्यातील एक बडय़ा नेत्याने पाचारण करून स्वत:चा ११ टक्के हिस्सा प्रथम येथे टाकण्यासाठी दम भरला. त्यामुळे भांबावलेल्या या ठेकेदाराने टक्केवारीपेक्षा तुमचे कामच नको, अशी भूमिका घेतल्याची धक्कादायक माहिती एका विश्वसनीय सूत्राने दिली.

पालिका हद्दीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यास अधिकाऱ्यांपेक्षा पालिकेतील रिंगमास्टर, सत्ताधारी पक्षातील विविध गट, त्यांची अरेरावी  कारणीभूत असल्याची चर्चा पालिकेत आहे. याविषयी सत्ताधारी शिवसेना भाजपमधील कोणीही पदाधिकारी, नगरसेवक उघडपणे बोलण्यास तयार नाही. खासगीत मात्र टक्केवारीमुळेच हे प्रकल्प रखडत असल्याची कबुली काही लोकप्रतिनिधी देत आहेत. सध्या पालिकेत काम करायचे असेल तर पहिले ठाणे मग डोंबिवली, कल्याणमधील नेत्यांचेही ‘पाहावे’ लागते. त्यामुळे कडोंमपात काम करणे अलीकडे खूप अवघड होत आहे, असे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका बडय़ा ठेकेदाराने सांगितले.

कडोंमपाचा यापूर्वी स्वच्छता सव्‍‌र्हेक्षणात ६४ वा क्रमांक होता. हा क्रमांक आता थेट २३४ वर गेल्यामुळे पालिका हद्दीतील कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचा संदेश जनमानसात गेला आहे. १९९५ कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेची ही गलितगात्र अवस्था सहन न झाल्याने अखेर महापौरांना अधिकाऱ्यांना फैलावर घ्यावे लागले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय घरत, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, घनकचरा उपायुक्त धनाजी तोरस्कर, जल अभियंता चंद्रकांत कोलते, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ उपस्थित होते.

ज्या बाबींमध्ये पालिकेला कमी गुणांकन झाले आहे. त्याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आधारवाडी क्षेपणभूमी बंद न करणे, कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प मार्गी न लावणे, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती न करणे यामुळे हे गुणांकन कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. येत्या महिनाभरात कचऱ्याची परिस्थिती सुधारा, असे आदेश महापौर देवळेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पालिका हद्दीत लवकरच ७ बायोगॅस सयंत्र, ३ शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारे प्रकल्प आकाराला येतील. त्यामुळे बऱ्यापैकी कचरा प्रश्न सुटेल, असे जलअभियंता कोलते यांनी सांगितले. विविध सहकारी सोसायटय़ा कचरा प्रकल्प उभारणीसाठी पुढे येणार असतील तर त्यांना मालमत्ता करात सूट द्या, माझे कल्याण माझी डोंबिवली अभियान प्रभावीपणे राबवा, लोकांना स्वच्छता प्रकल्पात सहभागी करून घ्या, असे आवाहन महापौरांनी केले.

डोंबिवलीत मोहीम

घरगुती कचऱ्याचे योग्य नियोजन केले तर शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माणच होणार नाही. म्हणून सोसायटय़ांमध्ये जाऊन कचऱ्याविषयी जनजागृती करण्याची मोठी मोहीम सामाजिक कार्यकर्त्यां अपर्णा कवी यांनी आपल्या सहकारी महिलांसह स्वयंस्फूर्तीने सुरू केली आहे. पालिकेचा याकामी सहकार्य घेतले जात आहे. सोसायटय़ांमध्ये जाऊन घरातील कचरा घरातच कसा विघटित करावा. ओला, सुका कचरा वेगळा करून त्याचे विघटन. सोसायटीचा कचरा सोसायटीच्या आवारात कसा विघटित करावा. याचे मार्गदर्शन करीत आहेत. दररोज कवी यांचा गट चार ते पाच सोसायटय़ांमध्ये तेथील महिला, पुरुष यांना एकत्रित करून कचऱ्याविषयी जनजागृती करीत आहे. या उपक्रमाची ज्या रहिवासी, सोसायटय़ांना मोफत माहिती हवी असेल त्यांनी अपर्णा कवी यांच्या ९८३३७४३५३७ येथे संपर्क साधावा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan mayor hold crucial meeting on garbage project