ठाणे : मुंब्रा येथील कौसा भागात राहणाऱ्या फैसल उस्मान खान (२५) या तरुणाला तीन जणांनी पकडून बेदम मारहाण केली आणि सुटका करण्यासाठी त्यांनी त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती केल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील दिवा आगासन रस्त्यावर हा प्रकार घडला असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात तीन जणांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगेश मुंढे (३०), अनिल सूर्यवंशी (२२) आणि जयदीप मुंढे (२६) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्वजण दिवा आगासन परिसरातील रहिवाशी आहेत. मुंब्रा-कौसा येथील तन्वरनगर भागात राहणारे फैसल उस्मान खान (२५) हे प्रवासी कार चालविण्याचे काम करतात. एका प्रवाशाने त्यांना रविवारी पहाटे दिवा आगासन भागात बोलाविले होते.  त्या ठिकाणी जात असताना त्यांची कार रस्त्यावर बंद पडली. त्यावेळेस तिथे दुचाकीवरून  हे तिघे आले. रस्त्यात गाडी का उभी केली, असा जाब विचारत मंगेश याने शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीत तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी सोडून देण्याची विनंती केली. त्यामुळे तिघांनी त्याला शिवीगाळ करत ‘जय श्री राम’ची सक्ती केली. तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim youths forced to chant jai sri ram in thane three arrested zws