ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे सांगून काही भामट्यांनी ठाण्यातील एका व्यवसायिकाची एक कोटी सात लाख ६५ हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक झालेला ६४ वर्षीय व्यवसायिक चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. त्यांचा भिवंडी येथे औषध विक्रीचा व्यवसाय आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाॅट्सॲप या समाज माध्यमाद्वारे एका महिलेने संपर्क साधला होता. तिने त्यांना शेअर बाजाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका व्हाॅट्सॲप समूहामध्ये सामाविष्ट करण्यात आले. त्यांना शेअर बाजारात जादा परताव्याचे अमीष दाखविण्यात आले होते.
काही दिवसांनी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणूकीसाठी एक ॲप मोबाईलमध्ये सामाविष्ट करण्यास सांगण्यात आले. व्यवसायिकाने त्यांच्या मोबाईलमध्ये ते ॲप सामाविष्ट केले. या ॲपच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाईनरित्या गुंतवणूकीस सुरुवात केली. त्या व्यवसायिकाने टप्प्या-टप्प्याने एक कोटी सात लाख ६५ हजार हजार रुपये इतकी रक्कम गुंतविली. त्यांना आता मोठा नफा झाल्याचे ॲपमध्ये दर्शविण्यात आले होते. त्यांना हा नफा त्यांच्या बँक खात्यात वळता करायचा होता. परंतु नफ्याची रक्कम बँक खात्यात वळती होत नव्हती. त्यांनी संबंधित महिलेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तसेत त्यांनी तिला व्हाॅट्सॲपवर लघुसंदेश देखील पाठविला. परंतु त्यावरही त्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणीत्क्रार दाखल करण्यासाठी चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.