ठाणे : गोवा राज्यातून निर्मित अवैध मद्याची वाहतुक चक्क सिमेंट मिक्सर वाहनातून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत पथकाने अवैध मद्याच्या बाटल्यांनी भरलेले ५९५ खोके जप्त केले आहेत. या प्रकरणी वाहन चालक मोहन जोशी याला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोवा राज्यात निर्मित मद्याला राज्यात बंदी आहे. असे असतानाही हा मद्याचा साठा छुप्या पद्धतीने राज्यात आणला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकांनी सीबीडी -डी.वाय. पाटील स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील घाट रस्त्यात मंगळवारी मध्यरात्री गस्त घातली. पथकांची गस्ती सुरू असतानाच १० चाकी सिमेंट मिक्सर हे वाहन संशयास्पदरित्या येत असल्याचे पथकाला आढळून आले. त्यानंतर पथकाने ते वाहन अडविले. त्या वाहनाची पथकाने तपासणी सुरू केली. त्यावेळी वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या मिक्सरचे झाकण उघडले असता, त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित अवैध मद्याचा साठा आढळून आला.

पथकाने वाहन ताब्यात घेतले. या वाहनातून अवैध मद्याच्या बाटल्या भरलेले एकूण ५९५ खोके आढळून आले. दारुबंदी गुन्ह्यांतर्गत पथकाने वाहन जप्त केले. वाहनासह हा एकूण ६६ लाख ३९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक महेश धनशेट्टी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane illegal liquor transport in cement mixer vehicle 595 boxes full of liquor bottles seized ssb