शहापूर तालुक्यातील खर्डीजवळील चांदा गावात तीन जणांचे मृतदेह आढळून आल्यानं मोठी एकच खळबळ उडाली होती. मामा-भाचे व गावातील एका विवाहित तरुणानं जंगलात जाऊन झाडाला गळफास घेतला होता. एका गुराख्याला तिघांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेप्रकरणी वेगवेगळे कयास लावले जात असताना घटनेमागील नेमकं कारण समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुंबई मिरर’नं दिलेल्या वृत्तानुसार या तिघांनी मोक्ष मिळावा म्हणून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. १४ नोव्हेंबरपासून नितीन भेरे (रा. शहापूर), महेंद्र दुभेले (रा.चांदा ३०, खर्डी) व मुकेश घायवट ( रा. चांदा २२, खर्डी) हे तिघे अचानक बेपत्ता झाले होते. याबाबत सर्वत्र तपास करूनही त्यांचा शोध न लगल्याने त्यांच्या नातेवाईकांनी १७ नोव्हेंबर रोजी शहापूर व खर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

त्यानंतर शुक्रवारी (२० नोव्हेंबर) शहापूरच्या जंगलात गुरे चारायला घेऊन जाणाऱ्या चांदा गावातील रूपेश सापळे या गुराख्याला एका झाडाला तीन लटकलेले मृतदेह दिसून आले होते. या तिघांनी एकाच साडीने गळफास घेतला होता. त्याचबरोबर मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि इतरही काही वस्तू आढळून आल्या होत्या. गुराख्यानं याची माहिती खर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर तिघांची ओळख पटवण्यात आली. नितीन याला मंत्र-तंत्राचं आकर्षण होतं. ते तिघेही बऱ्याच वेळा धार्मिक ठिकाणी एकत्र यायचे. अमावस्येला मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, या अंधश्रद्धेतूनच तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane shahapur three peoplecommit suicide religious reason bmh