ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. याबैठकीत लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे अद्याप माझ्याकडे एसटी भाडेवाढीची अधिकृत फाईल आलेली नाही. परंतू, १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली अशी माहिती परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून मिळाली. एसटीची भाडेवाढ ही दरवर्षी होणे गरजेचे आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगतिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन च्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः एसटीच्या जमीन विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, एसटी महामंडळाला दररोज तीन कोटी तर, महिन्याला ९० कोटीचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही. मी प्रधान सचिवांना सांगितले आहे की, भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित भाडेवाढ करावी, असेही ते म्हणाले. तसेच येत्या १ फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ होणार असून टॅक्सी आणि रिक्षाचे प्रति किलो मीटर प्रमाणे तीन रुपयांनी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…महापालिकेच्या घंटागाडीने वृद्धाला फरफटत नेले, अपघातात वृद्धाचा मृत्यू

राज्यातील एसटी आगारांचा विकास होणार

राज्यातील एसटी आगारांचा विकास होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की, अत्याधुनिक बस स्थानक मिळावं तेथे विविध सोयी सुविधा असाव्यात यासाठी सरकारने सर्व एसटी आगारांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, यासाठी राज्यशासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर किंवा बीओपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, असे सरनाईक म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane transport minister pratap sarnaik said it is necessary to increase fare of st every year sud 02