कल्याण – कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गेल्या वर्षी हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणातील गुन्ह्यात गणपत गायकवाड यांच्यासह एकूण सात आरोपींमध्ये वैभव गायकवाड यांचेही नाव तक्रारदाराकडून घेण्यात आले होते. या गोळीबार प्रकरणानंतर वैभव फरार होते. आता उल्हासनगर न्यायालयात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रातून वैभव यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरुध्द कोणताही सहभागाचा पुरावा आढळून आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या शिवसेनचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी पोलिसांनी वैभव गायकवाड यांना पुरवणी आरोपपत्रातून वगळले असेल तर आपण याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे.

जमिनीच्या वादातून गेल्या वर्षी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणात एकूण सात जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव यांचाही समावेश तक्रारदाराकडून गुन्ह्यात करण्यात आला होता.

या गोळीबार प्रकरणामुळे गणपत गायकवाड आणि इतर दोन जण तुरुंगात आहेत. चार जण जामिनावर बाहेर आले आहेत. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हे प्रकरण घडल्यापासून फरार होता. वैभवच्या अटकेसाठी महेश गायकवाड यांनी पोलिसांना अनेक निवेदने दिली आहेत. पोलिसांनी या गोळीबारप्रकरणीचे आरोपपत्र उल्हासनगर न्यायालयात यापूर्वीच दाखल केले आहे. आता पुरवणी आरोपपत्रातून वैभव गायकवाड यांचे नाव वगळण्यात आले आहे.

याप्रकरणात पोलिसांनी सांगितले, गोळीबाराच्या घटनेत वैभव यांचा थेट सहभाग आढळून आलेला नाही. त्यांच्या विरूध्द कोणतेही ठोस पुरावे नाहीत. गोळीबाराची घटना होण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसते. त्यामुळे त्यांचे नाव पुरवणी आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे.

गणपत गायकवाड यांच्या सुटकेसंदर्भात मागील काही महिन्यांपासून विविध प्रकारच्या वावड्या उठत आहेत. त्यांची लवकरच सुटका होईल, असा अफवांचा सूर आहे.

महेश गायकवाड यांचा इशारा

महेश गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले, माझ्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला त्यावेळी वैभव याचा सहभाग होता. तो पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये दिसतो. त्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. मात्र, त्याच्यावर राजकीय दबावामुळे पोलिसांना कारवाई करता आलेली नाही. राजकीय दबावामुळे याप्रकरणात कारवाई होत नसल्याने आपण कायदेशीर सल्ला घेऊन वैभवच्या नाव वगळण्याच्या कृतीला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav gaikwad kalyan supplementary charge sheet mla ganpat gaikwad firing case ssb