जगात एकूण आठ खंड आहेत. त्यातल्या आठव्या खंडाचा आता शोध लागलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगात सातच खंड आहेत. पाचवीत लक्ष दिलं असतं तर भूगोलाच्या बाईंना जरा बरं वाटलं असतं.

पण जगात आठ खंड आहेत. भूगोलाच्या बाईंना त्यावेळी हे माहीत नव्हतं.

न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी हा आठवा खंड शोधलाय. या खंडाला त्यांनी नाव दिलंय ‘झीलँडिया’.

आॅस्ट्रेलियाला लागून हा आठवा खंड असल्याचं या संशोधकांनी सांगितलंय. ‘जिओलाॅजिकल  सोसायटी आॅफ अमेरिका’ या जर्नलमध्ये या संशोधकांनी त्यांच्या या शोधाविषयी सांगितलंय.

पण जगाचा नकाशा पाहिला तर आॅस्ट्रेलियाच्या आसपास एवढा मोठा भूप्रदेश दिसत नाही. न्यूझीलंडचं छोटंसं बेटच दिसत राहतं. आणि त्याच्या पलीकडे दिसतो तो अथांग पॅसिफिक महासागर. मग हा ‘झीलँडिया’ आहे तरी कुठे?

छाया सौजन्य: मॅप्स.काॅम

 

हा ‘आठवा’ खंड पाण्याखाली आहे!

जगाचा नकाशा आता आहे तसा नेहमीच नव्हता. नकाशा काढणाऱ्यांची चूक नाही त्यात पण जगातल्या सगळ्या खंडांची अतिशय मंदगतीने हालचाल होत असते. कोट्यवधी वर्षांपासून जगातल्या वेगवेगळ्या खंडांमध्ये खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे बदल होत गेले. काही खंड एकमेकांपासून तुटले तर काही जोडले गेले. आज आशियात असणारा आपला भारत एकेकाळी  आफ्रिकेला लागून होता!

कोट्यवधी वर्षांपासून होणारी खंडांची हालचाल (१ मिलियन- १० लाख) (छाया सौजन्य- आयएएस मेनिया)

 

हीच सगळी हालचाल होत असताना सुमारे ८ कोटी वर्षांपूर्वी ‘झीलँडिया’ चा हा भाग आताच्या आॅस्ट्रेलियापासून तुटला आणि पाण्याखाली गेला.

“हे सगळं पाणी आम्हाला बाजूला करून हा खंड अभ्यासायला मिळाला तर बरं होईल” हा खंड शोधणारा संशोधक निक माॅर्टिमर राॅयटर्स या वृत्तसंस्थेला म्हणाला.

अर्थात तो हे विनोदाने म्हणत होता. कारण ४५ लाख चौरस किलोमीटरचा आणि पॅसिफिक महासागरात बुडालेला ‘झीलँडिया’चा अभ्यास करायचा असेल तर पाण्याखालीच जावं लागेल.

नाही म्हणायला या खंडाचा ६ टक्के भाग समुद्रसपाटीवर आहे. न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनियाची बेटं म्हणजेच या ‘झीलँडिया’ खंडाचा पाण्याच्यावर असलेला भाग!

आता यावर शास्त्रज्ञांच्या जगात चर्चा होईल, मतमतांतरं होतील आणि मग या  ‘खंडाला’ जागतिक मान्यता मिळेल.

पण तरीही भूगोलाच्या तासात आपण लक्ष ते काही देणार नाही! घोर कलियुग!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientist find eighth continent named zealandia