|| रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सुरभि’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात सूत्रसंचलन करतानाचा रेणुका शहाणे यांचा हसरा चेहरा आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘सुरभि’ म्हणजे रेणुका शहाणे हे समीकरण बनून गेले होते. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचलन, अभिनय, लेखन-दिग्दर्शन अशी सर्जनशीलतेची वेगवेगळी वाट चोखाळणारी ही गुणी अभिनेत्री सध्या ‘क्राईम पेट्रोल’सारख्या शोचे सूत्रसंचलन करते आहे.

रेणुका शहाणे आणि सूत्रसंचलन म्हटल्यावर ‘सुरभि’चा उल्लेख अटळ आहे, हे हसत हसत मान्य करतानाच १९९० ते आता २०२१ मध्ये ‘क्राईम पेट्रोल’सारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मध्ये बराच काळ गेला आहे. त्या वेळी ‘सुरभि’ या एकाच कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीशी निगडित विविध माहिती सादर केली जायची. आता तसा कार्यक्रम होऊ शकत नाही, कारण प्रत्येक प्रांताशी निगडित मनोरंजन वाहिनी असल्याने देशभरातील विविधांगी गोष्टींचं चित्रण एका कार्यक्रमात करण्याची गरजच उरलेली नाही. मलाही आता कारकीर्दीच्या या टप्प्यावर असं काही करायचं होतं जे मी आजवर केलेलं नाही, पण त्याच्याशी मी जोडलेले आहे. ‘क्राईम पेट्रोल’ हा शो मी स्वत: पाहात होते त्यामुळे त्याचं सूत्रसंचलन करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा तात्काळ होकार दिल्याचे रेणुका यांनी सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांत कार्यक्रमांचे स्वरूप आणि सूत्रसंचलनाची शैली यातही खूप बदल होत गेले आहेत, मात्र शो कोणत्याही स्वरूपाचा असला तरी तुमचं भाषेवर प्रभुत्व असावंच लागतं, असं त्या सांगतात. ‘क्राईम पेट्रोल’चं सूत्रसंचलन करताना आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांमधील गुंतागुंत आणि ते अनेकदा जवळच्या व्यक्तींकडून घडत असतात, याबद्दलची सतर्कता निर्माण करायची असते. त्यामुळे त्यातलं गांभीर्य हरवणार नाही, पण लोकांना कंटाळाही येणार नाही, या पद्धतीने समतोल साधत संवाद साधावा लागतो, असं त्या सांगतात. रेणुका यांच्या कारकीर्दीची सुरुवात अभिनयापासून झाली असली तरी त्यांना पहिल्यापासून दिग्दर्शनातच रस होता, असं त्या सांगतात. ‘लाईफलाईन’ नावाची मालिका केली होती १९८८ मध्ये… ती मी केलेल्या सुरुवातीच्या मालिकांमध्ये एक होती. ८७ मध्ये मी दूरदर्शनवर सुरुवात केली होती. ‘लाइफलाइन’च्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या. त्यांना मी तेव्हा साहाय्य केलं होतं. तेव्हापासूनच दिग्दर्शन करण्याचं माझं स्वप्न होतं. दिग्दर्शन हा माझा ध्यास होता. त्या अनुषंगाने मी लेखन करायला सुरुवात केली. आता मला लेखनच इतकं आवडायला लागलं की मी तेव्हापासून लिहिते झाले. अभिनयाचं म्हणाल तर मला संधी मिळत गेल्या. सुरभिमुळे मला नाव मिळालं, लोकप्रियता मिळाली त्यामुळे मला कधी ऑडिशन्स द्याव्या लागल्या नाहीत. ओघाओघानेच मी अभिनयाच्या क्षेत्रात आले, असं सांगतानाच दिग्दर्शनाची सुरुवात करायला उशीरच झाल्याचेही त्यांनी सांगितले. माझी रुची पहिल्यापासून दिग्दर्शनातच होती. पण त्यासाठीची जमवाजमव करून प्रत्यक्ष काम सुरू करायला मला वेळ लागला. अभिनयातच मी इतकी व्यग्र होते की मला उसंतच मिळाली नाही. लग्न झाल्यानंतर मी काही काळ काम कमी केलं होतं. मग माझे पती आशुतोष राणा यांनी आठवण करून दिली, तुला दिग्दर्शन करायचं होतं त्यासाठी आत्ताचा हा काळ खूप योग्य आहे. मराठी चित्रपटांसाठीचा सुवर्णकाळ आहे याची त्यांनी जाणीव करून दिली, तेव्हा मग मी ‘रिटा’चा विचार सुरू केला, अशी आठवण त्यांनी सांगितली.

या वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘त्रिभंगा’ हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तीन पिढ्यांतील तीन स्त्रियांचा आयुष्याकडे पाहण्याचा भिन्न-भिन्न दृष्टिकोन दाखवणारा हा चित्रपट अनेकांची दाद मिळवून गेला. या चित्रपटाची कथा कशी सुचली याविषयी बोलताना, माझ्या आयुष्यात मी अशा बऱ्याच जणांना भेटले, ज्यांचे त्यांच्या आईशी फार चांगले संबंध नव्हते. मला हे फार आश्चर्य वाटत होतं, कारण माझं आणि माझ्या आईचं खूप घट्ट नातं आहे. मी तिला माझी गुरू मानते, तत्वज्ञ-मार्गदर्शक मानते. सख्खी मैत्रीण मानते. आई आणि मुलीच्या नात्यापलीकडचं असं आमचं नातं आहे. आणि ते नातं म्हणजे माझ्या असण्याचा एक मोठा भाग आहे. समजा त्याच नात्यात एखादी त्रुटी असती तर काय झालं असतं, असा मी विचार सुरू केला. त्यादृष्टीने लिहायला सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं. दुसरं म्हणजे मुलं आणि पालक यांच्यात संवाद हवाच, तरीही हे नातंच इतकं गुंतागुंतीचं असतं की त्या त्या वेळी गोष्टी लक्षात येत नाहीत. आणि मग एखादी तिऱ्हाईत व्यक्ती आपल्याला वेगळा दृष्टिकोन देऊन जाते, तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो की नाही आपल्याकडूनही काहीतरी मोठी चूक झालेली आहे, आपलाही दृष्टिकोन त्या वेळी योग्य नव्हता हे आपल्याला लक्षात येतं. हे सगळं ‘त्रिभंगा’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं.

‘दूरचित्रवाणीवर पुरोगामी विचारांना स्थान नाही’

दूरचित्रवाणीवर पुरोगामी विचारांना अजूनही स्थान नाही. तिथे तर प्रयोग करायलाही कोणी धजावत नाही. त्यामुळे त्या माध्यमाकडून मला फार अपेक्षा नाहीत. त्या तुलनेत ओटीटीवर सध्या आपण जगभरात काय घडतं आहे हे आपल्या सोईने आणि बसल्याजागी पाहू शकतो. त्या अनुषंगाने आपण आपलीच सर्जनशीलता किंवा कल्पकता वाढवून आशयनिर्मिती करू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अर्थात, ओटीटी वाहिन्यांची संख्याही भरमसाट वाढत असल्याने पुढेमागे इथेही सगळीच सकस आशयनिर्मिती असेल असं नाही, तिथेही गाळ येणारच. त्यातल्या त्यात उत्कृष्ट काय आहे हे निवडून आपल्याला पाहता येतं, असं सांगतानाच ओटीटीमुळे भिन्न भारतीय प्रांत आणि भाषांमधले चित्रपट आपल्याला पाहता आले. आत्तापर्यंत असे चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला फेस्टिव्हल्सची वाट पाहावी लागायची. टाळेबंदीच्या काळात मी उत्तम मल्याळम चित्रपट पाहिले. मल्याळममध्ये इतकं चांगलं काम होतं आहे याची जाणीवच मला या काळात ओटीटीमुळे झाली, अशी आठवणही त्यांनी सांगितली. ओटीटीवर आपल्या वेळेनुसार पाहायचे राहून गेलेले काही महत्त्वाचे चित्रपट, वेबमालिका पाहू शकतो ही सोय महत्त्वाची असल्याचे त्या सांगतात.

सायबर गुन्ह्यांविषयी सतर्कता निर्माण करायला हवी

रेणुका ‘क्राईम पेट्रोल’च्या ज्या पर्वाचे सूत्रसंचलन करत आहेत, त्यात मुलांद्वारे झालेले गुन्हे किंवा त्यांच्याबाबतीत घडलेले गुन्हे दाखवण्यात येत आहेत. यातलं प्रत्येक प्रकरण खरंतर संतापजनक, त्रासदायक असंच आहे, असं त्या म्हणतात. पूर्वी गुन्हे घडतच होते, मात्र सध्या समाजमाध्यमांमुळे या गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. दर दोन दिवसांनी आपल्याला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या गुन्हेगारी घटना ऐकू येत असतात. सायबर गुन्हे तर इतके आहेत की मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमातून त्याविषयची माहिती देऊन त्यांना जागरूक करणं मला गरजेचं वाटतं. या शोमध्ये कुमारवयीन मुलांना आणि त्यांच्या पालकांना सजग करणाऱ्या घटना दाखवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hosted by popular shows like surabhi renuka shahane smiling face akp
First published on: 03-10-2021 at 00:00 IST