सद्य:स्थितीत केवळ ५० टक्केच प्रवासी
वसई : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. असे असले तरी एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याऐवजी ही संख्या आणखीनच रोडावली आहे. याचा मोठा फटका एसटीला बसू लागला आहे. सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के इतकेच प्रवासी यातून प्रवास करीत आहेत.
पालघर जिल्ह्याात एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. यात वसई, नालासोपारा, अर्नाळा, पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू, जव्हार यांचा समावेश आहे. या आगारातून लांबपल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या व ग्रामीण इतर ठिकाणच्या भागात गाड्या सोडल्या जातात. सुरुवातीला करोनाच्या निर्बंधामुळे एसटीसेवा ही मोजक्याच ठिकाणी सुरू हाती, परंतु आता राज्यातील बहुतांश भागात करोनाचा प्रभाव ओसरल्याने आता एसटी महामंडळाने एसटीची प्रवासी वाहतूकही सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच अनुषंगाने पालघर जिल्ह्याातील एसटीची ८० ते ८५ टक्के सेवा ही सर्व ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. यात
सध्या ३३० गाड्या सुरू केल्या असून यात ८० लांबपल्ल्याच्या ठिकाणी जाणाऱ्या आहेत व इतर ग्रामीण, ठाणे, बोरिवली यासह इतर मार्गावर सुरू आहेत. गाड्या जरी सुरू झाल्या असल्या तरी सुरुवातीला ज्याप्रमाणे प्रवासी यातून प्रवास करीत होते त्यांची संख्या कमी झाली असल्याची माहिती एसटी महामंडळ पालघर विभाग यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेमुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा एसटी रुळावर येण्यास सुरुवात झाली तोवर करोनाची दुसरी लाट आली आणि एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले. आता करोनाची दुसरी लाट कमी होत असल्याने अनेक ठिकाणच्या भागात शिथिलता मिळाली आहे, त्यामुळे एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा ओढा हा एसटीकडे वाढेल अशी आशा होती. मात्र पालघर एसटी महामंडळ विभागात हवे त्या प्रमाणात प्रवासी एसटीने प्रवास करीत नसल्याने प्रवाशांची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. याआधी जवळपास ६५ टक्क्यांहून अधिक भारमान होते. आता तेच भारमान ४८ ते ५० टक्क्यांवर आले आहे.
पालघर विभागात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. सध्या केवळ ५० टक्के इतके प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण आहे. येत्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. – राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक पालघर एसटी महामंडळ