वसई : वसईच्या किल्ला परिसरातील बिबट्या मागील १५ दिवसांपासून मोकाट असल्याने या भागातील नागरिकांचे जीवन बिबट्याच्या दहशतीमुळे विस्कळीत झाले आहे. बिबटयाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी प्रांत अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, बिबट्यामुळे संध्याकाळी ६ नंतर रोरो बोटीच्या सेवा बंद कराव्या अशी मागणी पुरातत्व खाते तसेच वनविभाहाने महाराष्ट्र सागरी मंडळाला केली आहे.

२९ मार्च रोजी वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्या आढळला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अद्याप बिबटा सापडलेला नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी वसईच्या उपविभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रांताधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी, वनविभागाच्या मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी श्वेता आडे, पुरातत्व विभागाचे कैलास शिंदे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, रोरो सेवा कर्मचारी, कोळीयुवा शक्ती संघटनेचे पदाधिकारी तसेच किल्लाबंदर-पाचूबंदर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र या बैठकीत बिबट्याला पकडण्यात येत असलेल्या अपयशामुळे नागरिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा : गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन

किल्ल्यातील बिबट्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतानाही वनविभागा कडून बिबट्याला पकडण्यासाठी हव्या त्या प्रमाणात प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप कोळी युवा शक्ती संघटनेचे मिल्टन सौदीया यांनी केला आहे. तर बिबट्या बाबत अनेक संशय निर्माण होऊ लागले आहेत. हा बिबट्या पाळीव तर नाही ना? वन विभाग बिबट्याला शोधण्यासाठी खरंच पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावले आहेत का ? बिबट्यामुळे याभागातील नागरिकांची ये जा करण्याची वहिवाट कायमची बंद करण्याचा हा डाव तर नाही ना असे अनेक प्रश्न संजय कोळी यांनी या बैठकीत उपस्थित केले आहे. १६ दिवस उलटून झाले वन खाते बिबटयाला पकडू शकल नाही . यात वनखाते निष्फळ निष्किय ठरलं आहे . लोकांचा जीव जाण्याची वनखाते वाट बघत आहे का ?असा आरोप कुलदीप वर्तक यांनी केला आहे . बिबटया सारखा हिस्त्र जनावर वसईत किल्यात फिरत असून वनाधिकारी वसईत फिरकले नाहीत. नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही का असा सवाल वसई कॉंग्रेसचे वसई विधानसभा अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची ठोस उत्तरे वनविभागाकडून ग्रामस्थांना दिली जात नाहीत. याशिवाय या भागातील नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही. रोरो सेवा, ताडी उतरविणारे व इतरांना या भागात प्रवेश करू दिला जातो मात्र येथील स्थानिक नागरिकांना जाण्यास बंदी घातली जाते. मग येथील नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

बिबट्या पकडण्यासाठी व्यापक मोहीम घ्या- प्रांताधिकारी

बिबट्याच्या वावरामुळे असंख्य अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आपले प्रयत्न वाढवा अशा सूचना वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी केल्या आहेत. आमच्या स्तरावरून जी काही मदत लागेल ती देण्यास ही आम्ही तयार आहोत असेही घाडगे यांनी यावेळी सांगितले. हा बिबट्या तुंगारेश्वर जंगलातून या भागात आला आहे. त्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. परंतु बिबट्या बाहेर येण्याच्या वेळेत सातत्याने मानवी वर्दळ, रोरो सेवा यामुळें पकडण्यात अडचणी येत असल्याचे मांडवी वनपरीक्षेत्र अधिकारी श्वेता आडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : महिला प्रवाशाने घेतला महिला तिकिट तपासनिसाचा चावा, वसई रोड रेल्वे स्थानकातील घटना

रोरो सेवेच्या सायंकाळच्या फेऱ्या रद्द करा

बिबट्याचा वावर असल्याने संध्याकाळी ६ नंतर रोरो सेवा बंद करावी असे वनविभाग आणि पुरातत्व खात्याने महाराष्ट्र सागरी मंडळाला लेखी पत्राद्वारे सांगितले आहे.