लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : जानेवारी महिन्यात नालासोपारा येथील एका दगडखाणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पेल्हार पोलिसांना यश आले आहे. सुरवातील हा अपघाती मृत्यू असल्याने अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पुढील तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी मयत ब्रिजेश चौरसिया याच्या मित्राला अटक केली आहे.

१७ जानेवारी २०२४ रोजी नालासोपारा पूर्वेच्या धानिव पांढरीपाडा येथील खदाणीत ब्रिजेश चौरसिया (४१) या इसमाचा मृतदेह आढळला होता. मद्याच्या नशेत तो ६० फूट उंचीवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या खिशात मद्याची बाटली आढळली होती. त्यामुळे मद्याच्या नशेतच तो तोल जाऊन पडला असावा असा निष्कर्ष पेल्हार पोलिसांना काढला आणि याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मयत ब्रिजेश चौरसिया याच्या बहिणीने संशय व्यक्त केला होता.

आणखी वाचा-पालिका गुंतली निवडणुकीच्या कामात, भूमाफिया जोमात

त्यामुळे पोलिसांनी पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला. ब्रिजेशच्या खिशात बलराम यादव (२७) याचे आधारकार्ड सापडले होते. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली मात्र त्याने माझे आधारकार्ड हरवले होते आणि मी ब्रिजेशला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांकडे कसलाच पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी यादव याच्या मोबाईलचे सीडीआर (कॉल्सचे तपशील) काढले. तेव्हा तो आणि ब्रिजेश संपर्कात असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांनी बलराम याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

आणखी वाचा-सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

पैशांचा तगादा लावल्याने केली हत्या

मयत ब्रिजेश आणि बलराम हे मित्र होते. बलरामने ब्रिजेश कडून ५५ हजार रुपये उसने घेतले होते. त्यासाठी ब्रिजेश बलरामच्या मागे लागला होता. एकदा त्याने बलरामला कोंडून बेदम मारहाण देखील केली होती. त्यामुळे बलरामच्या मनात राग होता. १७ जानेवारी रोजी दोघे वालीव येथून मद्यपान करून परतत होते. रस्त्यात खदाण लागली. आसपास कुणी नव्हते. ही संधी साधून बलरामने ब्रिजेशला खाली ढकलले आणि त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या पथकाने या हत्येचा उलगडा करून आरोपीला अटक केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mystery of dead body found in quarry solved revealed to have been murdered by a friend mrj