लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई: विरार येथे रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करताना अपघात घडला आहे. यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वसई विरार मध्ये रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचे सत्र सुरूच आहे. यामुळे येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. गुरुवारी रात्री पटेल कुटुंब विरारच्या फलाट क्रमांक पाच वरून चारवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करीत होते. याच दरम्यान फलाट क्रमांक चार वरून येणाऱ्या गाडीची जोराची धडक बसली यात पती पत्नी व मुलगा अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

अजितकुमार पटेल (२८), सीमादेवी पटेल (२६), आर्यन पटेल (३ महिने) अशी मृतांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहेत. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे.

रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर अधिक  धोकादायक आहे. परंतु लवकर जाण्यासाठी, जिने चढउतार करण्याचा कंटाळा अशा प्रकारामुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train accident in virar three members of the same family died while crossing the railway tracks mrj