स्वयंपाकघराच्या कट्टय़ावर येणाऱ्या चिऊताईला भातासाठी तांदूळ धुताना चार दाणे ठेवायची हाताला सवय होतीच. हा लेख वाचून लगेच तो अमलात आणायचे मनाशी ठरविले. शीतपेयाची बाटली, लाकडी चमचा एवढेच जुजबी साहित्य असल्यामुळे फार खटाटोप नव्हता. सुरी तापवून बाटलीला भोक पाडले आणि चमचा त्यातून सहजरीत्या आत सरकवून Bird feeder तयार केले. वाण्याकडे जाऊन बाजरी आणि तांदळाची कणी आणली. बाटलीत भरून ती बाटली स्वयंपाकघराच्या ग्रिलच्या हूकला टांगली. लेखात लिहिल्याप्रमाणे ४ ते ५ दिवस वाट बघावी लागणार होती; पण ‘पी हळद आणि हो गोरी’ या उक्तीप्रमाणे नवऱ्याला आणि मुलाला काही वाट बघवली नाही. ‘अगं, ते इथे कुठे टांगलेस? एवढय़ावरचे चिमणीला दिसणार नाही, तिला खालीच दाणे टिपायची सवय आहे, ती बाजरी खाणार नाही,’ वगैरे वगैरे टोमणे मारत या बर्ड फीडरची रवानगी दुसऱ्या बेडरूमच्या गॅलरीत झाली. तिथेही ४-५ दिवस चिमण्या काही फिरकत नव्हत्या. दुपारी आणि क्वचित काळोख झाल्यावर स्वयंपाकघरातील ओटय़ावर मात्र त्या दिसेल ते टिपायला येत होत्या. असेच ८-१० दिवस गेले. मी नोकरीवर जात असल्याने रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी फक्त हे निरीक्षण मला अधूनमधून करता येई.
असेच एका रविवारी शॉपिंगकरिता ठाण्यातील मॉलमध्ये गेले असताना तिथे plant stall वर एक बर्ड फीडर टांगलेला दिसला. यांनी व मुलाने लगेच तो घेतला. यांच्या टांगण्यावरूनही आमच्यात मतभेद होऊन तो आता तिसऱ्या गॅलरीत जिथे French Window आणि बांबूचे मोठे झाड आहे तिथे टांगण्यात आला. तो टांगूनही बरेच दिवस झाले. चिमण्या नुसत्याच झाडांमध्ये, ग्रिलवर चिवचिवाट करीत, पण बर्ड फीडरवर बसून दाणे टिपताना काही दिसत नव्हत्या. असेच आणखी काही दिवस गेले आणि रक्षाबंधनानंतरच्या सोमवारी मी ऑफिसमधून घरी आल्यावर यांनी बातमी दिली- ‘अगं, आज तुझ्या बर्ड फीडरमधील दाणे खायला दोन पोपट आले होते. दुपारी मी किती तरी वेळ त्यांचे निरीक्षण करत होतो.’
‘अहो, मग मोबाइलवर फोटो नाही काढायचा का त्यांचा?’ मी रागावून म्हटले.
‘अगं, माझ्या लक्षातच आले नाही, मी त्यांनाच न्याहाळत होतो.’
दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास परत पोपटांचा कलकलाट ऐकू आला. मी लगेच गॅलरीकडे वळले. गॅलरीच्या काचा बंद असल्याने त्यांना मी दिसणे शक्य नव्हते, पण मला ते बघता येत होते. बाहेरच्या काचेत त्यांना त्यांचे प्रतिबिंब मात्र दिसत असले पाहिजे, कारण ग्रिलवर बसून किती तरी वेळ आरशात बघावं तसं मान तिरपी करून ते बघत बसले होते. नर आणि मादीची जोडी होती ती. नर थोडासा मोठा, मानेकडे काळी रिंग, गळ्याकडे ताईतासारखा निळाशार कढ, डोळ्याभोवती पिवळ्या रंगाचे कडे आणि लालचुटूक बाकदार अणकुचीदार चोच, मादी थोडीशी चणीने लहान, नाजूक, शेपटीही नरापेक्षा लहान. माझी टेहळणी चालू होती. तेवढय़ात तिसरा पोपट दाखल झाला. पहिल्यातल्या नराने त्याला चोच मारून उडवायचा प्रयत्न केला, तोही थोडं उडल्यासारखं करून परत ग्रिलवर दुसरीकडे जाऊन बसे. उडताना त्याच्या शेपटीच्या सुरुवातीची नक्षी जपानी पंख्यासारखी हिरव्या, पिवळ्या, मोरपिशी रंगाने बहरलेली दिसे आणि टोकाकडे गर्द पोपटी निमुळती होत गेलेली. मी त्यांचा तो मन लुब्ध करणारा खेळ बघत होते; पण घडय़ाळाचे काटे मला खुणावत होते आणि नोकरीधंद्याच्या व्यापात आपण काय गमावतोय याची खंत मला टोचणी लावून जात होती. संध्याकाळी घरी आल्यावर यांनी बातमी पुरविली- ‘अगं, पोपटांचा थवाच दुपारी दीड-दोन वाजता आणि संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान इथेच बस्तान ठोकून असतो. आळीपाळीने आणि तेही एक-दोन नाही, तर दहा-बारा जण येतात एकत्रपणे.’
‘ काय सांगताय?’ माझा चेहरा समोर ते दृश्य बघितल्यासारखा आनंदला. आता मी पुढच्या रविवारची वाट बघू लागले. सकाळी मला साडेसहा-सातला त्यांच्या ओरडण्याने जाग येई आणि त्यांना बघण्याचे नजरसुखही मिळे, पण ऑफिसला जाण्याची घाई मला तो आनंद जास्त वेळ लाभू देत नसे. रविवार आला आणि उशिरापर्यंत झोपणार आहे असे जाहीर करणारी मी वेळेच्या आधीच सकाळी साडेसहा वाजताच गॅलरीच्या ग्रॅनाइट कट्टय़ावर ठाण मांडून बसले. थोडय़ाच वेळात पोपटांचा कलकलाट ऐकू आला आणि एक एक करत त्यांची शाळा ग्रिलवर भरली. दाणे टिपण्यासाठी त्यांची ती कसरत, पायाने व चोचीने ग्रिलच्या दांडय़ा शिडीसारख्या चढण्याची करामत, उलटं लटकून चालण्याची सर्कस, सगळ्याचा आनंद मी मनमुराद लुटत होते. डोळे ते हिरवेगार पाचूपक्षी बघून तृप्त होत होते. ईश्वराने घडविलेला तो जीव, त्यांच्या जिवंत हालचाली एवढय़ा जवळून नैसर्गिकरीत्या बघताना मनाला लुभावत होत्या. आता सुट्टीच्या दिवशी माझा हा नित्याचा खेळ झाला होता. दुपारीही न झोपता मी आरामखुर्चीत बसून त्यांचे निरीक्षण न कंटाळता करत असे. त्यांच्या ओरडण्याने खालून जाणारीयेणारी माणसे, मुले वर गॅलरीकडे बघत राहात. आमच्या नातू परांजपे कॉलनीत असलेल्या बदामाच्या, गुलमोहराच्या, पांगाऱ्याच्या झाडांवर त्यांची ये-जा असे; पण एवढय़ा जवळून त्यांना बघण्याची संधी क्वचितच येई. अरे! पोपट बघ किती बसलेत वर गॅलरीत, पोरांचा गलका आणि कुतूहल, त्यांचे मोबाइलवर फोटो काढणे हा एक विषयच झाला होता.
माझ्या लेखी ते आहेत पाचूपक्षी. पाचूसारख्या गर्द हिरव्या रंगाचे, समोर झाडावर बसले तरी त्या पानांत त्यांचा रंग लपून गेल्याने ओळखता न येणारे देवाने किती सुरेख घडविले आहे या जीवांना. स्वत:ची बचाव सुरक्षा स्वत:च त्यामुळे ते करू शकतात. त्यांच्या निसर्गदत्त रंगांमुळे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते-
पाचूपक्षी पाचूपक्षी
निसर्गरचित हरित पक्षी
सुखवी लोभवी आपुल्या अक्षी
ईश्वर रूप हे सर्वसाक्षी
– स्नेहा मोंडकर