23 October 2019

News Flash

‘छोट्या राज्यांना पाठिंबा; पण मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’


छोट्या राज्यांच्या निर्मितीला भाजपचा कायमच पाठिंबा राहिला आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवशीच आम्ही ही भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला ताकाला जाऊन भांडे लपविण्याची सवय नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरील विरोधकांच्या आक्षेपांना ठामपणे प्रत्युत्तर दिले. गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आज यासंदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे. आम्ही तुमच्या मेहरबानीमुळे निवडून आलो नाही तर जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे आमच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्याचा हक्क जनतेलाच आहे, असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. एखाद्या स्वतंत्र राज्याची निर्मिती हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. राज्य सरकारसमोर तुर्तास तरी असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा होणे नियमाला धरून नाही. तेव्हा या चर्चेला पूर्णविराम द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आणखी काही व्हिडिओ