ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॅार्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला तीन दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. त्याच दरम्यान आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयाच्या एकूणच कामाचा आढावा घेतला आणि त्यावेळी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांबरोबर संवाद साधताना सौरभ राव म्हणाले की, वॉर्ड क्रमांक १६ मधील आरोपी ललित पाटील हा एक्सरे काढण्यासाठी बाहेर आला होता. त्यावेळी तो तेथून पळून गेला आहे. त्या घटनेनंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितलं.