7/11 Mumbai Local Bomb Blast Accused To be Free: 11 जुलै 2006 हा दिवस मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला आणि त्यानंतर 11 मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले ज्यात 209 जणांचे बळी गेले. 824 जण जखमी झाले. एकामागून एक झालेल्या बॉम्बस्फोटांनी मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकवलीच पण अनेक कुटुंबांचेही आधारस्तंभ हिरावून घेतले. पश्चिम रेल्वेच्या माहिम ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे बॉम्बस्फोट झाले. आज १९ वर्षांनी हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे कारण या सुन्न करणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले.