मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा दावा शिवसेनेने (ठाकरे) केला आहे. या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.