संहिता जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘निसर्ग शिक्षा देतोय’ वगैरे करोना-विषाणूच्या निमित्तानं म्हटलं गेलं. पण ‘शिक्षा’ हा शब्द निसर्गाला माहीत आहे का? वैज्ञानिक पद्धतीला तरी ‘शिक्षा’, ‘कोप’ असे शब्द कुठे माहीत असतात? विज्ञान फक्त ‘कशाने काय घडेल’ हे सांगतं. लस मिळू शकते, पण सुमारे १८ महिने लागतील, हाही विज्ञानावर आधारलेला अंदाज असतो.. सध्याच्या काळात पुन्हा विज्ञानाचं भान देणारं चिंतन..

खगोलशास्त्र शिकताना त्याच्या संशोधनाचा इतिहासही मी थोडा वाचला. सुरुवातीला लोक म्हणायचे, सगळं जग पृथ्वीभोवती फिरतं. मग सूर्याभोवती पृथ्वीसकट सगळे ग्रहगोल, आणि तारे फिरतात असा सिद्धांत आला. सध्याचा प्रचलित महास्फोटाचा सिद्धांत म्हणतो, विश्वाला केंद्रच नाही; सगळ्या दीर्घिका एकमेकांपासून लांब जात आहेत. विश्वाचा पसारा किती याचं आपण मनुष्यांना झालेलं आकलन पंधराव्या शतकापेक्षा खूप वाढलेलं आहे; पण तरीही आपली आपापली विश्वं अजूनही स्वकेंद्री आहेत आणि वैज्ञानिक पद्धत म्हणजे नक्की काय याचं समाज म्हणून आपल्याला झालेलं आकलन अत्यंत तोकडं असल्याचं दिसत आहे. सध्याचं कारण आहे कोविड-१९.

सध्याची परिस्थिती अशी की हा विषाणू आपल्यासाठी नवा आहे. याची अंतर्गत रचना नक्की कशी आहे; त्याचे नक्की किती उपप्रकार आहेत; त्याचा प्रसार कसा होतो; संसर्ग झालेला चटकन कसा ओळखायचा; संसर्ग झाला तरी अनेक लोकांत आजाराची लक्षणं का दिसत नाहीत; शरीर या विशिष्ट विषाणूचा विरोध नक्की कसा करतं; त्यावर औषध काय; त्यावर लस नक्की कशा तयार करायची; याचे महत्त्वाचे तपशील आपल्याला-  म्हणजे संपूर्ण मानवसमाजाला-  माहीत नाहीत.

वैज्ञानिक, संशोधक, अभ्यासक सर्वात आधी हे मान्य करतील की विज्ञानाला न सुटलेली चिकार कोडी आहेत. नवा करोनाविषाणू हे त्यांतलंच एक. वर ज्या सर्वमान्य महास्फोट सिद्धांताचा दाखला दिला, त्याबद्दल कुणा खगोलशास्त्रज्ञांना विचारा. सिद्धांतामधल्या त्रुटी हेच लोक सगळ्यात चांगल्या पद्धतींनी स्पष्ट करतील. वैज्ञानिक पद्धतीचं महत्त्व हेच की शिकल्यावर त्या-त्या विषयातल्या उणीवा आणि त्रुटी जास्त दिसायला लागतात.

विज्ञान म्हणजे नक्की काय? पृथ्वीभोवती सगळे ग्रहतारे फिरत असतील तर मग त्यांच्या काही (ग्रह) ‘वक्री’ का होतात, नेहमीच्या उलट दिशेनं आणि काही काळच का दिसतात, असे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. त्या प्रश्नांची सुरुवातीला जी उत्तरं शोधली ती पुढे लोकांना ओढूनताणून बसवल्यासारखी वाटली. म्हणजे बाण मारायचा आणि नंतर सभोवती वर्तुळ आखून ‘नेम लागला’ म्हणण्यासारखं. कोपर्निकसनं (इ.स. १५१७) सिद्धांत मांडला की ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि पृथ्वी हा एक ग्रह आहे. पुढे न्यूटनचं ‘प्रिन्सिपिया मॅथमॅटिका’ प्रकाशित होईस्तोवर (इ.स. १६८७) कोपर्निकसच्या सिद्धांताला गणिती आधार नव्हता. आपण शाळेत सरळसाधा भूगोल म्हणून जे शिकतो, तो सिद्धांत सिद्ध होण्यासाठी १७० वर्ष जावी लागली.

विज्ञानाच्या प्रगतीची गती आपल्या रोजच्या आयुष्यांपेक्षा खूप मंद असते. नव्या करोनाविषाणूचा मुकाबला करण्यासाठी जे विज्ञान आवश्यक आहे त्याची प्रगतीही दुर्दैवानं आपल्या अपेक्षांपेक्षा खूप कमी असणार आहे. यात ‘दुर्दैवा’ची बाब अशी की त्यात अनेकांचे जीव गेले आहेत; आणखीही मृत्यू होतील आणि अनेक देशांत चाललेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडणार आहेत; हे नुकसान, या उत्पाताचे परिणाम म्हणून अनेकांचे मृत्यू होणार आहेत.

विज्ञानात दुर्दैव वगैरे काही नसतं.

खात्रीशीर औषध आणि लस शोधण्यासाठी जेवढा वेळ लागायचा तो लागणारच आहे. त्यासाठी जास्त खर्च करून, जास्त स्रोत आणि योग्य व्यक्तींना कामाला लावून हा वेळ कमी करता येईल. पण त्यात दैवाधीन काही नाही.

वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय? विषाणूंची रचना, या विशिष्ट विषाणूचे गुणधर्म, तो कसा पसरतो; मानवी शरीरावर त्याचा काय परिणाम होतो; इतर काही प्राण्यांवर त्याचा कसा परिणाम होतो; किती विषाणूंशी संपर्क आल्यावर निरनिराळी मानवी शरीरं कसा प्रतिसाद देतात; या आणि अशा अनेक प्रश्नांचा तपशीलवार अभ्यास संशोधक करत आहेतच. पण हे सध्या अज्ञात आहे.

एखाद्या जंगलाचा नकाशा नाही; आपल्याकडे होकायंत्र आणि जीपीएस वगैरे काही नाही; फक्त जंगल पार करून जायचं आहे एवढंच माहीत आहे तेव्हा खाचखळग्यांपासून चुकीच्या रस्त्याला जाणं या सगळ्या अडचणींवर मात करावी लागते. आपण चुकीच्या रस्त्याला लागलो आहोत, हे योग्य रस्ता सापडेस्तोवर समजतही नाही. संशोधन तसंच असतं. (आपल्याला नवीन काही समजलं की, ‘हे नवंच संशोधन म्हणायचं’ असं म्हणायची भाषिक पद्धत असली तरी संशोधन म्हणजे कुणाला तरी माहीत असलेल्या गोष्टी पुन्हा शोधणं नाही.)

‘या विषाणूवर पक्का इलाज/ औषध आणि लस शोधण्यासाठी साधारण १८ महिने थांबावं लागेल’ अशा बातम्या सातत्यानं येत आहेत, त्याचं हेच कारण आहे. जगात कुणालाच जे माहीत नाही, ते शोधायला वेळ लागणारच. १९८०मध्ये देवी या रोगाचं उच्चाटन झाल्याचं जाहीर झालं. त्यानंतर जन्मलेल्या लोकांना देवीची लस टोचली जात नाही. देवीची पहिली नोंद भारतातली आहे, इ.स.पूर्व १५००; म्हणजे किमान ३५०० वर्ष या रोगावर इलाज नव्हता. तेव्हा कुणाला या रोगाचं कारण माहीत नव्हतं, म्हणून ‘देवी’चं नाव त्याला दिलं. यात देवीचा किंवा निसर्गाचा काही हात नव्हता; नसतो.

एड्सच्या भीषणपणामुळे एचायव्ही हा विषाणू आणि गेल्या काही वर्षांत पश्चिम आफ्रिकेत थैमान माजवणारा इबोला आपल्याला माहीत असेल. हे विषाणू फार ‘यशस्वी’ नाहीत. विषाणूंच्या बाबतीत यश म्हणजे काय तर टिकून राहाणं. विषाणूंची रचना अशी असते की मनुष्य किंवा इतर प्राणी, कोणत्याही सजीवाचं शरीर यजमान म्हणून मिळेस्तोवर त्यात जिवंतपणाचं लक्षणं नसतं. पण असं शरीर मिळालं की तो पुनरुत्पादन करतो; आपल्यासारखे इतर विषाणू शरीरात निर्माण करतो. आपण मनुष्य कोणाकडे पाहुणे म्हणून जातो तेव्हा त्यामागे काही हेतू असतो. असा हेतू असण्यासाठी बुद्धी, मेंदू, वगैरे बरीच गुंतागुंतीची शरीरं असावी लागतात. तशी सोय विषाणूंकडे नसते, ना निसर्गाकडे.

विषाणूंच्या ‘यशा’साठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत – इतर प्राण्यांच्या शरीरात टिकून राहाणं आणि एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करून तिथे टिकणं, म्हणजे संसर्ग, लागण. सर्दीचे विषाणू फारच यशस्वी आहेत. संपूर्ण जगात एका वेळेत मोठय़ा प्रमाणावर लोकांना सर्दी झालेली असते. सर्दीची लागणही सहज होते. आणि सर्दीमुळे मनुष्य मरत नाही; हे विषाणूंसाठी सोयीचं असतं; कारण मनुष्यच मेलाच तर राहायची सोय नाहीशी झाल्यामुळे विषाणूही मरेल. तरीही एचायव्ही, इबोला, नवा करोनाविषाणू माणसांचे जीव घेतात.

नव्या करोनविषाणू सध्या जास्त ‘यशस्वी’ आहे कारण त्यानं काही माणसं मरतात; काही गंभीर आजारी पडतात; आणि काहींना लक्षणं नसतातच. आजारी पडायच्या आधी किंवा बिनाआजार लागण झालेल्या माणसांपासून आजूबाजूच्या इतर अनेकांना लागण होत आहे. यात एक ठरावीक विषाणू असा काही वेळेचा अंदाज घेऊन काही करतो असं नाही. थोडं आजारी पाडून माणसं बरी झाली तरी विषाणूवर लस शोधायचे कष्टही घेतले नसते. सर्दीच्या विषाणूला आपण फार धूप घालत नाही. पण हे समजण्याची बुद्धी विषाणूला नसते. नुकत्या जन्मलेल्या आपल्या मुलांवर परक्या मुलांपेक्षा आपलं जास्त प्रेम असतं; हे मुद्दामून केलं जात नाही; तसंच. हा जनुकांचा गुणधर्म आहे. ग्रह सूर्याभोवती फिरणार हा निसर्गनियम आहे, तसंच.

विज्ञानाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधीच नसतात. वैज्ञानिक चुका करतात आणि विज्ञानाची प्रगती नेहमीच अडखळत, धडपडत होते. एका प्रश्नाचं उत्तर मिळतं तेव्हा आणखी चार प्रश्न पडतात आणि संशोधन कधीच थांबत नाही. विज्ञानामध्ये कुणा एका व्यक्तीचा शब्द शेवटचा नसतो.

निसर्गात ज्या गोष्टी घडतात त्या हेतुत: घडत नाहीत. त्यामुळे ‘असं का’ असा प्रश्न विचारला तरीही ‘हे कसं घडतं’ याचं उत्तरच मिळतं.

‘असं का’ या प्रश्नात काही हेतू आहे असं गृहीतक आहे. ते निसर्गनियमांना लागू नाही. विषाणू, ग्रहगती, भूकंप, रासायनिक अभिक्रिया, पहिल्या पावसानंतरचा गंध ह्य निसर्गाच्या कुठल्याही रूपाला हेतू नाही. हेतू असण्यासाठी बुद्धी असणं गरजेचं आहे; त्यासाठी किमान सगुण-साकार रूप असणं गरजेचं आहे. निसर्गाला तसं रूपच नाही. त्या निसर्गाचे नियम शोधण्यासाठी, विषाणूवर औषध, लस आणि तात्पुरते उपाय शोधण्यासाठी विज्ञानाचं हे मूलभूत तत्त्व अवगत करण्याला पर्याय नाही.

‘‘कुणीतरी हेतूत: आपल्याला करोनाच्या रूपात शिक्षा करत आहे, आणि ते कुणी आपली काळजीही घेतील’’, असं मानायला वाव असतो. हा विचार सुखावणारा असला तरीसुद्धा स्वकेंद्री विश्वासारखा अवैज्ञानिक आहे. तात्पुरतं समाधान आणि कायमस्वरूपी इलाज यांत फरक करणं नव्या करोनाविषाणूच्या निमित्तानं शिकलो तर पुढच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण आणखी जास्त सज्ज राहू. हे असं का, कारण ते तसंच आहे.

लेखिका रेडिओ खगोलशास्त्रात पोस्टडॉक करून आता विदावैज्ञानिक म्हणून काम करते.

truaditi@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on contemplation that gives a sense of science again in the present time abn