ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, विचारवंत भालचंद्र नेमाडे यांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांनी उलगडून दाखविलेले आगळेवेगळे नेमाडे.. लोकसत्ता लोकरंगमध्ये (२६ मे २०१३) प्रसिद्ध झालेल्या या लेखाचा संपादित अंश ज्ञानपीठच्या आनंद सोहळ्यानिमित्ताने आज पुन्हा प्रकाशित करीत आहोत.
आता तुम्ही म्हणाल की ज्ञानपीठ म्हणजे काय, तर हा एक साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार असून तो उदाहरणार्थ थोर थोर साहित्यिकांना देण्यात येतो. आता हे थोर साहित्यिक म्हणजे कोण, तर भालचंद्र नेमाडेंना मराठीतील थोर साहित्यिक म्हटले जाई कारण त्यांनी अनेक थोर थोर कादंबऱ्या लिहिल्या व पुन्हा साहित्याची समीक्षाही केली व देशीवादसुद्धा मांडला. तेव्हा हे गृहस्थ खरोखर थोरच होते हे तर त्यांच्या सुहृदांनी जागविलेल्या समृद्ध वगैरे स्मृतींतूनही दिसते. आता तुम्ही म्हणाल की या स्मृती म्हणजे काय, तर त्या येथेच देत आहोत..
नेमाडय़ांना ज्ञानपीठ मिळाल्याचे शुक्रवारी दुपारी कळले आणि सर्वप्रथम मी पदमदेव कौशल याला आणि नंतर प्राध्यापक चेतन सिंग यांना फोन केला. चेतन हा शिमल्याच्या प्रसिद्ध इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज या संस्थेचा संचालक, तर पदमदेव हा तिथला कंत्राटी ड्रायव्हर. दरवर्षी इन्स्टिटय़ूटमध्ये
नेमाडय़ांच्या सहवासात ‘कोसला’चा विषय निघणार नाही असं क्वचितच घडलं. कॉलेजात असताना नेमाडय़ांची ‘कोसला’ वाचली नाही असं माझ्या मित्रपरिवारात कोणीच नव्हतं. धुळ्याच्या ज्या प्रसिद्ध महाविद्यालयात नेमाडे शिकवीत त्याचे चित्रण ‘कोसला’त आले आहे. त्यातील आमच्या खानदेशी वातावरणामुळे ते मला अधिकच जवळचे वाटायचे. त्यात काही विक्षिप्त प्राध्यापकांचे वर्णन नेमाडय़ांनी त्यांच्या खास शैलीत केले आहे. ते वाचताना मजा यायची. पुढे ७५-७६च्या दरम्यान पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासृ-मंडळाच्या मीटिंगसाठी धुळ्याच्या त्या महाविद्यालयातले तर्कशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. (कै.) भालचंद्र केतकर आले असता ‘कोसला’चा विषय निघाला. तेव्हा त्यातील ‘तो विक्षिप्त प्राध्यापक म्हणजे मी’ अशी माहिती प्रा. केतकर यांनी दिली. विद्यार्थी असल्यास येथे तर्कशास्त्र शिकविले जाईल अशी पाटीच केतकरांनी कॉलेजातल्या आपल्या रूमबाहेर लावली होती. नेमाडय़ांशी प्रत्यक्ष परिचय होण्याआधी ‘कोसला’तल्या त्यांच्या एका काल्पनिक नसलेल्या पात्राशी माझा असा अकस्मात परिचय झाला होता. आश्चर्य म्हणजे विक्षिप्त म्हणून रंगविलेल्या केतकरांचे आणि नेमाडय़ांचे संबंध पुढील आयुष्यात मत्रीचेच राहिले होते! नेमाडय़ांच्या धुळ्यातल्या दिवसांचे काही धागे असे अचानक हाती लागले होते. नेमाडय़ांची प्रत्यक्ष ओळख नसताना नेमाडय़ांशी ओळख व्हावी असे वाटायचे. फर्गसनच्या दिवसातले त्यांचे हॉस्टेलमेट प्रा. शंकरराव तळघट्टी, मराठवाडा विद्यापीठातील त्यांचे सहकारी प्रा. उत्तमराव भोईटे हे माझे ज्येष्ठ सहकारी मित्र. त्यांच्याकडून क्वचित नेमाडय़ांचा विषय निघायचा. पण भेटीचा योग आला नव्हता. तो आला तेव्हा या संधीचा फायदा घेऊन ‘कोसला’ आणि ‘िहदू’बद्दल नेमाडय़ांना अधिक बोलते करण्याची संधी मी शोधत होतो. ती मला इन्स्टिटय़ूटमध्ये ‘ट्रान्सग्रेशन’ (उल्लंघन) या बहुआयामी कल्पनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्याच्या निमित्ताने मिळाली. ‘कोसला’तील पांडुरंग आणि िहदूतील खंडेराव हे नेमके कोण आहेत? त्यांचे प्रश्न काय आहेत? त्यांच्या प्रेरणा कोणत्या आहेत? ते कोणत्या सीमारेषेवर उभे आहेत? या अनुषंगाने नेमाडय़ांनी बोलावे असे ठरले व नेमाडय़ांनी ते मान्य केले. जोडीला अशोक बाजपाई, इन्स्टिटय़ूटमधले सध्याचे नॅशनल फेलो व िहदीतले प्रसिद्ध कवी राजेश जोशी आदी मंडळी होती. ‘कोसला’तला पांडुरंग आपल्या भोवतीचा परीघ ओलांडण्याचा प्रयत्न करतो, हे मी कादंबरी लेखनाच्या सुरक्षित परिघामध्ये लिहून गेलो. पण ‘िहदू’तला खंडेराव परंपरेच्या परिघाचे समर्थन करतो हे मी कादंबरी लेखनाचा सुरक्षित परीघ ओलांडल्यावरच लिहू शकलो, हा मुद्दा त्यांनी मांडला आणि तो मांडताना सीमा कशाला ओलांडायच्या, परंपरा कशाला मोडायच्या, जाती का सोडायच्या हे प्रश्न विचारून एकच (वैचारिक) धमाल उडवून दिली..
..आणि घरी जेवताना गुजराती किंवा हिमाचली कढीऐवजी आपली मराठी कढीच बरी असे म्हणून देशीवादाचा पुरस्कारही करून गेले!
(लेखक पुणे विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. सध्या शिमल्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीजमधील रवींद्रनाथ टागोर पीठासनाचे फेलो आहेत.)
प्रा. शरद देशपांडे