जंगलात पुरेसे खाद्य व पाणी मिळत नसल्याने वन्य प्राणी लोकवस्तीत आणि शेती बागायतीमध्ये घुसून नुकसान करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. या वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी वन विभागाची काही योजना नाही. शिवाय, नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने दिलेले आहेत. पण जिल्ह्यातील सुमारे दीडशेहून जास्त शेतकऱ्यांच्या शेती संरक्षण बंदूक परवान्यांचं नूतनीकरण रखडलं आहे. दुसरीकडे, विपुल जंगल संपत्तीमुळे जिल्ह्यात माकड-रानडुकरांपासून गवे आणि हत्तींपर्यंत विविध प्रकारचे जंगली प्राणी मात्र यथेच्छ धुमाकूळ घालत असतात. या परिस्थितीमुळे संत्रस्त शेतकऱ्यांनी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक श्री. एस नवलकिशोर रेड्डी यांची भेट घेतली आणि माकड-वानरांना उपद्रवी प्राणीह्ण म्हणून घोषित करून कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत नेहमीप्रमाणे एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचे ठोकळेबाज उत्तर उपवनसंरक्षकांनी दिले. त्यावर संतप्त शेतकऱ्यांनी वन्य प्राणी लोकवस्तीत आणि शेती-बागायतींमध्ये येणार नाहीत याची खबरदारी वन विभागाने घ्यावी अन्यथा आम्हाला हाती बंदुका घ्यावा लागतील, असा थेट इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पैसे ही खाण्यासारखी गोष्ट आहे का?

सातारा पालिकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीवेळी भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि शहर विकासाचे सुंदर स्वप्न दाखवले होते. त्यांच्या आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका लुटून खाल्ल्याचा तसेच त्यांच्या नगरसेवकांमध्ये  पैसे खाण्याची शर्यत लागली होती असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या आघाडीवर केला. त्यावर उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले.  होय आम्ही  पैसे खाल्ले.. पण पैसे ही खाण्यासारखी गोष्ट आहे का ..असे उत्तर दिले. पैसा कोणी खाल्ला आणि कोणी नाही. पैसे कोणी खाऊ शकता का असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले पैसे खाल्ले असते तर विकासकामे झाली असती का? त्यांच्या काळात कामे झाली नाहीत असे आम्ही म्हणायचे का, त्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचार करून बोलावे. देवाने तोंड दिले, जीभ दिली, म्हणून त्यांनी अजून बोलावे, खुशाल बोलावे असा सल्ला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिला.

प्रकाशन करावे तरी कितीदा?

हल्ली वाचकसंख्या कमी झाली आहे अशी तक्रार केली जाते. दुसरीकडे लिहिणाऱ्यांचे हात काही थांबत नाहीत. पुस्तक प्रकाशन होत नाही असा दिवस उगवत नाही. अर्थात त्याचा दर्जा काय याच्या खोलात न गेलेलेच बरे. तर अशाच एका काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राजकीय नेते मंडळींना निमंत्रित केले की कार्यक्रम पत्रिकेतील नव्हे तर त्यांच्या आगमनाच्या वेळेनुसार कार्यक्रम सुरू करावा लागतो; हा अलिखित नियम. निश्चित केलेली वेळ उलटून दोन तास झाले. संध्याकाळची रात्र झाली तरी राजकीय नेते मंडळी यायची लक्षणे दिसेनात. उपस्थित तर कंटाळलेले. अखेर उपस्थितांमधूनच पाहुणे निश्चित करून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रथेप्रमाणे सुरुवातीला पुस्तकाचे प्रकाशन झाले. थोडय़ाच वेळात आमदारांचे आगमन झाले. मग काय; त्यांच्या हस्तेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रम संपता संपता माजी खासदारही आले. त्यांना कसं डावलून चालेल बरे ? त्यांच्या उपस्थितीतही आणखी एक डाव प्रकाशन झाले. सतत होणाऱ्या प्रकाशन सोहळय़ावरून उपस्थितांत चर्चा रंगत होती.

कामगार संमेलन की मंत्र्यांचे कौटुंबिक संमेलन ? 

एक तपानंतर कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यस्तरिय कामगार संमेलन मिरजेत संपन्न झाले.  पालकमंत्री सुरेश खाडे हे कामगारमंत्री असल्याने मिरजकरांना हे संमेलन पाहण्याची व ऐकण्याची संधी मिळाली. लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना स्त्री वेदनेची पारंपरिकता दर्शवत असताना माणूस यंत्रशरण जात असल्याकडे लक्ष वेधले असले तरी अखेरीस मनुष्यच सर्जनशील असल्याने जगण्यातील आशावादही अधोरेखित केला. या संमेलनामध्ये प्रस्थापित प्राध्यापक,  शिक्षक या साहित्यांचा प्रांत आपलाच समजल्या जात असलेल्या वर्गातून आलेल्या प्रतिनिधींची संख्या कामगार वर्गापेक्षा अधिक होती. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संमेलनामध्ये मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व्यासपीठावर मानाचे स्थान दिल्याने हे कामगार साहित्य संमेलन म्हणजे कुटुंबाचे राजकीय लॉचिंग होते का, असा  प्रश्न पडला होता. २२ लाख रुपये खर्च करून झालेल्या या संमेलनाकडे विशेष आमंत्रण देऊनही दोन खासदार, दहा आमदार यांच्यासह नगरसेवकांनी पाठ फिरवली. मग हे संमेलन केवळ औपचारिकता होती, की मतदारसंघात मिरवण्याची हौस ? असा प्रश्न मिरजकरांना पडला आहे.

 (सहभाग :  दिगंबर शिंदे, अभिमन्यू लोंढे, दयानंद लिपारे, विश्वास पवार.)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp udayanaraje satara municipal elections bhosale election corruption suresh khade meeting ysh