आपण छान दिसावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. त्या छान दिसण्यासाठी प्रत्येकजण भरपूर प्रयत्नही करत असतो. जेव्हा एखादा माणूस छान दिसतो तेव्हा त्याला ते छान दिसणं कायमचं त्याच्याकडे जपायचं असतं. मग छान दिसत असताना फोटो काढून घेणं आणि ते आयुष्यभर जपून ठेवणं या गोष्टी हौसेने केल्या जातात. फोटोसाठी छान जागा शोधल्या जातात, तोंडावरची रंगरंगोटी सारखी केली जाते आणि चेहऱ्यावर हसू फुलवलं जातं. ते हसू किती खरं आणि किती खोटं हे मात्र पाहणाऱ्याला कधी ओळखता येणार नसतं. या हसण्याचा कंटाळा यायला लागला तसे कॅमेऱ्यात न पाहता बाहेर पाहणं, सगळे नवरस चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करणं, एकाच वेळी चेहरा एक सांगतो तर डोळे भलतंच काहीतरी असे सगळे प्रयोग करून झाले. तरीही फोटोतल्या प्रत्येक हावभावाला झालेला कृत्रिमतेचा स्पर्श काही पूर्णत: पुसून टाकता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटोतले स्वत:चेच फसवे चेहरे पाहण्याचा लोकांना कंटाळा आला आणि फोटोग्राफरने गंमत म्हणून काढलेले, कॅ मेऱ्याकडे लक्षही नसतानाचे आणि खरोखर खळखळून हसतानाचे आपलेच फोटो त्यांना आवडायला लागले. माणसातलं खरेपणाचं स्वच्छ प्रतिबिंब असलेल्या या फोटोंना ‘कॅ न्डिड’ हे बिरुद लाभलं जे मुळात इंग्रजीमध्ये ‘सच्चेपणा’ या अर्थाने सामावलेलं होतं. आपलं लक्ष नसताना काढलेल्या या फोटोतली आपल्या चेहऱ्यावरची एक्स्प्रेशन्स अगदी प्रांजळ आणि अस्सल असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ती हसरी असतातच असंही नाही आणि न हसल्यामुळे फोटो वाइट येतो असंही नाही. या कॅन्डिडचं वेड वाढतच गेलं आणि हळूहळू आता एक नवीन प्रकार सुरू झाला तो म्हणजे ‘फेक कॅन्डिड’! एखादी गोष्ट लोकप्रिय व्हायला लागली की त्यातलाही सच्चेपणा हरवून आपण मोकळे होतो. केवळ लोकांना आवडतं म्हणून आपण त्या पद्धतीने वागू लागतो. असंच काहीसं या ‘कॅन्डिड’चंही झालं आहे.

कॅन्डिड फोटो लोकांना आवडतायेत म्हटल्यावर मुद्दाम आपलं लक्ष नाही असा भास निर्माण करणं आणि क्लिक केलेल्या फोटोंना कॅन्डिड ठरवून मोकळं होणं अशा गोष्टी आताशा बरेचजण करतात. काहीवेळा तर ‘मला माझे कॅन्डिड फोटो हवेत, तसेच काढ आणि क्लिक करताना मला सांग म्हणजे मी नीट कॅन्डिड पोज देईन’ असं मुद्दाम फोटोग्राफरला सांगणारी हुशार (?) मंडळीही दिसून येतात. त्यामुळे आजकाल कोणाच्या कॅन्डिड फोटोंवरही विश्वास ठेवणं अवघड होऊन बसलंय ! न जाणो केवळ कॅमेऱ्याला दाखवायला म्हणून खोटा प्रांजळपणा धारण केला असेल तर उगीच नंतर ‘हार्टब्रेक’ व्हायचा !

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about fake candid photos