सायली सोमण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपडे खरेदीला गेल्यावर आपल्याला आकर्षून घेणारं कापडच आपण निवडतो. कधी कधी एखाद्या समारंभामध्ये एखादी व्यक्ती तिच्या पेहरावामुळे आपले लक्ष वेधून घेते. कधी त्याचा रंग आपल्याला आवडतो तर कधी त्यावरील विणकाम, भरतकाम, नक्षीकाम तर कधी त्यावरची अनोखी प्रिंट. कपडय़ावर दिसणाऱ्या या सर्व प्रकारांना ऑर्नामेंटेशन किंवा एम्बेलिशमेंट टेक्निक म्हणतात. आजपर्यंतच्या अनेक लेखांमध्ये मी या ‘सरफेस ऑर्नामेन्टेशन’चा सतत उल्लेख केला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया..

सरफेस ऑर्नामेंटेशन किंवा एम्बेलिशमेंट म्हणजे थोडक्यात कल्पकतेच्या जोरावर सजावटीचे पर्याय वापरून एखाद्या साध्या कपडय़ाची एस्थेटिक व्हॅल्यू वाढवणे. मग ते कोणत्याही प्रकारचे असो. विणकाम, शिवणकामातील वेगवेगळ्या प्रकारचे टाके, पद्धती, भरतकामाच्या पद्धती, प्रकार, कापड रंगवणे, डाय करणे इ. सर्व. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त फॅशन इंडस्ट्रीपुरतंच मर्यादित नाही तर इंटिरियर अपहोलस्टरी/ड्रेप्समध्ये पण अत्यंत महत्त्वाचे आहे.शिवणकामातील सजावटीवर बोलायचं झाल्यास त्यात अनेक प्रकार आहेत.

शिवणकामातील सजावटीवर बोलायचं झाल्यास त्यात अनेक प्रकार आहेत. उदा. छोटय़ा बाळाच्या कपडय़ांवर केले जाणारे स्मोकिन, उशा आणि चादरींवर केले जाणारे क्विल्टिंग, स्त्री-पुरुषांच्या कुर्त्यांवर दिसणाऱ्या प्रिंट्स हे सर्व प्रकार एकदा लक्ष देऊन शिकल्यानंतर कमीतकमी वेळात जास्तीतजास्त सुंदर परिणाम देणारे आहेत. कधी एखाद्या साध्याशा कुर्त्यांचे निराळे बटन, कट, गळा/बाहीभोवतालची वेगळ्या रंगाची बॉर्डर हे एक वेगळीच छाप सोडतात.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कापडावरील रंगसंगती, प्रिंट्स, डाइंगचे वेगवेगळे प्रकारही यात येतात. उदा. बाटिक प्रिंटिंग, टाय अ‍ॅण्ड डाय, लेहरीया, बांधणी, मार्बल डायिंगच्या साडय़ा, कपडे जास्त लोकप्रिय आहेत. शिवाय फार महाग नसल्याने विकतही जास्त घेतले जातात. यातील आणखी एक गंमत म्हणजे योग्य पद्धत माहिती असेल तर घरच्या घरीही टाय अ‍ॅण्ड डाय, बाटिक सारखे प्रयोग करून पाहता येतात. फॅब्रिक पेंटिंगद्वारेतर कपडय़ाचा संपूर्ण कायापालटच होतो. साध्या दिसणाऱ्या डेनिमपासून बनवलेल्या जीन्स किंवा जॅकेट्सवर जे वॉशेस दिसतात त्याला डायिंगमधील सरफेस ऑर्नामेंटेशन म्हणता येईल. डायिंगच्या जोडीला प्रिटिंगचाही यात उपयोग होतो. प्रिंटेड साडय़ा, बूट, कुर्ते, टीशर्ट सगळीकडे ते वापरले जाते. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त उत्पादनाचा हा एक मार्ग आहे. स्क्रीन प्रिंटिंग, ब्लॉक  प्रिंटिंग, रबर प्रिंट, डिजिटल प्रिंटिंग या असल्या अनेक प्रकारांमध्ये प्रिंटिंग केले जाते. पण सध्याच्या झटपट काळात डिजिटल प्रिंटिंगमुळे लोकांच्या गरजा कमीतकमी वेळात पूर्ण होत आहेत.

आता आपण पाश्चिमात्य, इंडो वेस्टर्न, पारंपरिक या सर्व प्रकारच्या पेहराव आणि दागिन्यांवर वापरल्या जाणाऱ्या पॅच वर्क, अपलीक वर्क आणि कट वर्क टेक्निकबद्दल थोडं विस्ताराने बोलू. अपलीक वर्क उत्तर पूर्व प्रदेशांमध्ये, तसेच ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील गेल्या अनेक शतकांपासूनची मूळ कला मानली जाते. गेल्या काही वर्षांत लोकांच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यात बदल झाले. उदाहरणार्थ ‘रॉकस्टार’ चित्रपटातील रणबीर कपूरच्या जॅकेट्स आणि ट्राऊझर्सवरील अतरंगी पॅचेस हे वेस्टर्नवेअरमध्ये पॅचवर्क टेक्निकचं एक उत्तम उदाहरण आहे. तसेच अपलीक वर्कबद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळे कापडांचे तुकडे एकमेकांना जोडून बनवलेले झोला बॅग्स, पिलो कव्हर्स, बेडशीट्सबद्दल काही नव्याने सांगायला नको. कोणत्याही हँडीक्राफ्ट आणि टेक्स्टाईलच्या प्रदर्शनात किंवा मोठय़ा डिझायनर स्टोअर्समध्ये सध्या कस्टमाईज्ड कॉटन सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, सॅटिन, लेस नेट साडय़ांची संख्या खूप दिसते. या साडय़ा एक प्रकारे अपलीक आणि पॅचवर्क टेक्निकचाच आधुनिक प्रकार आहेत. उदा. पाटलीपल्लू/ हाफ अ‍ॅण्ड हाफ साडय़ांमध्ये एकमेकांना कॉम्प्लिमेन्ट करणारी फॅब्रिक्स जोडली जातात. ती साडी नेसल्यावर कुठलं फॅब्रिक कसं दिसेल, याची पूर्वकल्पना करून हे जोडले जाते. म्हणजे साडीच्या निऱ्या आणि पदर एका कापडाच्या असतील तर उर्वरित भाग आणि काठ दुसऱ्या कापडाचे असतात.

एम्ब्रॉयडरी अथवा भरतकाम हा सरफेस ऑर्नामेंटेशनमधील एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. आपल्या देशात जवळजवळ प्रत्येक प्रदेशात भरतकामाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. म्हणजे क्रॉस स्टिचमधील कर्नाटकी कशिदा, कासुती एम्ब्रॉयडरी, धावदोऱ्यामधील पश्चिम बंगालची कांथा एम्ब्रॉयडरी, राजस्थानच्या कच्छमधील काच्चीई आणि आरसाकाम, पंजाबातील फुलकारी असो. इतर अनेक प्रदेशांमधील भरतकामाचे प्रकार वेगवेगळे आहेत. वेळ वाचवण्यासाठी मशिन एम्ब्रॉयडरीची निर्मिती काही वर्षांपूर्वीच झालेली आहे. शिवाय हल्ली फ्युजनची फॅशन असल्याने बऱ्याच वेळा आपल्याला एम्ब्रॉयडरीचे एकापेक्षा जास्त प्रकार वापरून एक नवी कोरी कलाकृती करायला मिळते.

फक्त एम्ब्रॉयडरीमध्येच नाही तर सरफेस ऑर्नामेंटेशनचे वेगवेगळे प्रकार एकत्र करूनही आपण एका कपडय़ाचे दृश्यमान स्वरूप बदलू शकतो. उदा. एका टाय अँड डाय साडीला आणखी उठावदार आणि भरीव बनवायचं असेल तर आपण त्या साडीच्या किनारीला त्याला साजेशी एखादी छान लेस लावतो किंवा त्या साडीवर आटोपशीर भरतकाम करतो. एखाद्या कपडय़ाचे दर्शनी मूल्य वाढवण्यासाठी आणि कापड आणखी उठावदार बनवण्यासाठी जेवढय़ा कल्पना सुचतील तेवढय़ा कमीच. पण त्याचवेळी ते कापड कोण वापरणार आहे, त्या व्यक्तीचे वय, आवड, प्रसंग, कापड सांभाळण्यास किती सुलभ आहे, रंगसंगती आवडीची आहे का अशा अनेक गोष्टी लक्षात घेत असतो. त्यामुळे या प्रकारच्या कार्यात मिनिमिलिस्टिक अ‍ॅप्रोच असणे हे एका उत्तम डिझायनरचे लक्षण आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloth art clothes art and craft