शहरात अस्वच्छता व डुकरांचा हैदोस असतानाच मामा चौकासमोरील डॉ. काल्रेकर नìसग होम परिसरात शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याने जवळपास पन्नासच्यावर जनावरे दगावल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. विषबाधेने अनेक पक्षांचाही घात झाला असावा, अशा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत जनावरांमध्ये गाय, म्हैस, शेळी, डुक्कर, कोंबडी, कुत्र्यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे, उपाध्यक्ष लोकेश यादव, अभय अग्रवाल, सतीश देशमुख आदींनी घटनास्थळी दाखल होऊन मृत जनावरांना पुरण्यासाठी प्रयत्न करीत होते. संसर्गजन्य आजाराची लागण सुरू असून, ही लागण डुकरांच्या हैदोसाने होत असल्याचा आरोपही शहरवासीयांनी केला होता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शेकडो डुकरांचा असाच मृत्यू झाला होता. त्यातच या परिसरात लग्नसोहळ्यातील शिल्लक शिळे अन्न परिसरात टाकण्यात आले. हे अन्न डुकरे खातील म्हणून काहींनी संधीचे सोने करण्यासाठी त्यामध्ये कीटकनाशके टाकली. हे अन्न जनावरांसह पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मरणसत्र सकाळपासून सुरू झाले. दुपापर्यंत ५० च्यावर जनावरांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. मृत जनावरांमध्ये दोन गायी, दोन म्हैस, पाच शेळी, तीन कुत्रे, डुकरे व काही कोंबडय़ांचा समावेश आहे. पशुमालकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अन्न खुल्या परिसरात असल्याने ते पक्ष्यांनी खाल्ले असावे, असा अंदाज असून काही पक्षी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृत जनवारांमुळे परिसरात साथीचे रोग पसरू नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने हे अन्न एका खड्डय़ात पुरले. जनावरांची विल्लेवाट लावण्यासाठी नगर परिषदेचे सफाई कामगार कामाला लागले आहे. या घटनेमुळे डॉ. काल्रेकर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी शहर पोलीस प्रकरणांवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. पोलिसांनी मृत जनावरांचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविला आहे.      

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 animals dead because of posion in gondiya