गोंधवणी येथील निवृत्ती भागुजी गोराणे (वय ७५) या वृद्धाचा खून जागा विकून आलेल्या पैशाच्या वादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खूनप्रकरणी अट्टल गुन्हेगार संतोष ऊर्फ जीत जवाहर चव्हाण (वय १९, रा. आंबेडकर वसाहत, गोंधवणी) यास अटक करण्यात आली असून दि. २० पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गोंधवणी येथील गोराणे वस्तीवर राहणाऱ्या निवृत्ती गोराणे या वृद्धाचा खून दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला होता. गोराणे यांचा भाचा दत्तात्रय लक्ष्मण वैद्य याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.
पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी या खुनाचा तपास केला. गोराणे याने दादासाहेब सोनावणे यांना जागा विकल्याचे त्यांना आढळून आले. सोनावणे यांच्याकडे चौकशी केली असता गुन्हेगार जीत चव्हाण याच्या मध्यस्थीने हा व्यवहार केल्याचे उघडकीस आले. चार लाखाला जागा विकल्याचा खरेदी खतात उल्लेख असला तरी ही जागा जास्त रकमेला विकलेली होती. हे पैसे सोनावणे यांनी चव्हाण याच्याकडे दिले होते. गोराणे याला पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे जागेच्या पैशाच्या व्यवहारातून दोघांमध्ये वाद होते. गोराणे व त्यांचा मुलगा कचरू यांच्यात वाद असल्याने खुनाचा आरोप आपल्यावर येणार नाही याची दक्षता चव्हाण याने घेतली होती. पण जागा खरेदीच्या व्यवहारामुळे खुनाला वाचा फुटली.
खुनाच्या गुन्ह्यात आणखी काही गुन्हेगारांचा समावेश आहे काय याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच फिर्याद देणारा भाचा दत्तात्रय वैद्य याचीही चौकशी केली जाणार असल्याचे निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aged murdered over money of land sale