तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराजवळ नवरात्राच्या प्रारंभाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन मरण पावलेल्या वृद्ध भाविकाच्या वारसास श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे २ लाख रुपये, तर किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय गंभीर जखमी व्यक्तीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मंदिर संस्थान करणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मृत भाविकाच्या कुटुंबीयास मदत मिळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विनंती करण्यात आली.
श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वाराजवळ ४ ऑक्टोबरला चेंगराचेंगरीचा प्रकार होऊन हरिदास दिनू खपाले (वय ६०, दसूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांचा मृत्यू झाला, तर अन्य काही भाविक जखमी झाले. तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त समितीने या बाबत संबंधितांना आíथक मदत करण्याचा निर्णय ठरावाद्वारे घेतला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जनार्दन गणपत जानकर (मंगळवेढा) यांच्या उपचारासाठी यशोधरा सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि., सोलापूर यांच्या नावे ३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाने अनेक निर्णय घेतल्याचे कळविले. वाहन व्यवस्थेत बदल, पोलिसांचा बंदोबस्त या बाबत माहिती देण्यात आली. मात्र, हे सर्व निर्णय पश्चातबुद्धी असल्याची टीका तुळजापूरमध्ये केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dependents of pilgrim gets 2 lack help from temple trust