गेल्या काही दिवसांपासून बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भावही गडगडले आहेत. त्यामुळे भाजीउत्पादक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
पावकिलोमागे साधारण ५ ते १० रुपये भाव असणाऱ्या भाज्या आता मात्र याच किमतीत किलोभर मिळत आहेत. त्यातच माल विकला न गेल्यामुळे भाज्या तेथेच टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मेथीची जुडी ठोक बाजारात दोन रुपयाला विकली जात आहे. टोमॅटो, पालक, भेंडी, वांगी, कोिथबीर, कांद्याची पात, हिरवी मिरची, दुधी भोपळा आदी भाज्या ५ ते १० रुपये किलोने विकल्या जात आहेत. लातूरच्या भाजीबाजारात जिल्हय़ातील उत्पादकांबरोबरच उस्मानाबाद, नांदेड, बीड आदी जिल्हय़ांतील भाजीपाला उत्पादक ठोक माल आणतात. भाज्यांचे भाव एकदम गडगडल्यामुळे वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने ते चांगलेच त्रासून गेले आहेत.
८० रुपये किलोपर्यंत विकल्या गेलेल्या कांद्याचे रोप आता तर ४ रुपये किलो दरानेही विकले जात नाही. कांद्याची लागवण वाढल्यामुळे रोपांचे भाव कमी झाले आहेत. शहरी ग्राहकांना अतिशय कमी भावात भाज्या मिळत असल्यामुळे कारणे काही असोत, पण ग्राहक मात्र खूश आहेत. भाज्यांचे भाव वाढले की उत्पादकांच्या नावाने ओरड केली जाते. प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा दलालाचाच लाभ अधिक होतो. आता भाव पडल्यामुळे शेतकरी उत्पादक अडचणीत आहेत. दलालाला मिळायचे पसे मिळतच आहेत. मात्र, भाज्यांच्या किमती घसरल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer in trouble market rate collapse