जिल्ह्यातील शेतकरी व गटसचिवांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला घेराव घालून अपात्र कर्जदारांना पात्र ठरवण्याबाबतचे परिपत्रक रद्द करावे, असे निवेदन बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना दिले. कृषिमंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांना नाबार्डच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांबरोबर आठवडय़ात चर्चा घडवून आणतो, असा शब्द दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अपात्र कर्जवसुलीला २८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. दिल्ली येथील बैठकीत काय होणार, याकडेच सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी व गटसचिव यांनी अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धडक दिली आणि मुख्य दरवाजासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला. शेतकरी बँकेच्या प्रांगणात बसून होते. बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना निवेदन देण्यासाठी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील (भुयेकर), पी. डी. पाटील, गटसचिव संघटनेने जिल्हाध्यक्ष संभाजी चाबूक यांच्यासह शिष्टमंडळ गेले. शिष्टमंडळाने अपात्र कर्जदारांना पात्र ठरवण्याबाबतचे परिपत्रक रद्द करून त्यांना कर्जपुरवठा चालू करण्याची मागणी केली. यावर प्रशासक चव्हाण आणि शिष्टमंडळाशी सखोल चर्चा झाली.
बँकेने २१ जानेवारी रोजी वसुलीबाबत सेवा सोसायटय़ांना परिपत्रक पाठवले आहे. ते परिपत्रक ताबडतोब रद्द करावे. कृषिमंत्री पवार हे शेतकरी व नाबार्डच्या अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणणार आहेत. जोपर्यंत ही चर्चा होत नाही, तोपर्यंत बँकेने २३ जानेवारीपर्यंत जमा-खर्च करण्याबाबतचे परिपत्रक परत करावे व अपात्र ठरवलेल्या कर्जदारांना नव्याने कर्जाचे वाटप करावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महाराष्ट्र किसान सभेचे कॉ. नामदेव गावडे, भैया माने, एम. एस. पाटील, पुंडलिक पाटील, विजयकुमार चौगले, रघुनाथ बरगे, पंडितराव केणे, प्रकाश तिरपणकर, विलास नार्वेकर यांच्या सह्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gherao to jilha bank for unfit debtors