भारताची राजधानी नवी दिल्लीमधील राजपथावर प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘पंढरीच्या वारी’चा चित्ररथ गिरगावकरांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरणार आहे ते स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिरगाव हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे. त्याचबरोबर रद्दी पेपरपासून साकारलेली २० फूट उंच मल्हारी मरतडाची मूर्ती लक्षवेधी ठरणार असून १२०० युवक-युवती ध्वज-ढोल पथकांमध्ये सहभागी होणार आहेत.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त २१ मार्च रोजी गिरगाव परिसरामध्ये ‘गिरगाव हिंदू नववर्ष स्वागतयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची नववर्ष स्वागतयात्रा ‘प्रगतिपथावर भारत’ या संकल्पनेवर बेतली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने केलेल्या प्रगतीचा चित्ररथांच्या माध्यमातून आढावा घेण्याचा प्रयत्न यात्रेमध्ये करण्यात येणार आहे. गिरगावातील फडके श्री गणेश मंदिर येथून सकाळी ८ वाजता चौपाटी येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोविंद दास यांच्या हस्ते गुढीपूजनाने ही यात्रा सुरू होणार आहे.
मूर्तिकार योगेश इस्वलकर यांनी रद्दी पेपरपासून साकारलेली २० फूट उंच मल्हारी मरतडाची मूर्ती, लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारलेली प्रभू श्री रामचंद्रांची ३२ फूट उंच मूर्ती या यात्रेचे एक आकर्षण असणार आहेत.
मात्र नवी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या संत परंपरेचे दर्शन घडविणारा ‘पंढरीची वारी’ साकारणारा चित्ररथ या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार प्रदीप मादुस्कर यांनी साकारलेली वैभवसंपन्न गणेशाची मूर्ती यात्रेच्या अग्रभागी असेल. गिरगावातील महिला आणि युवती वैभवसंपन्न गणेशासमोर गणपती अथर्वशीर्षांचे पठण करणार आहे. त्याचबरोबर लावणी, भारूड, गोंधळ, वासुदेव, नंदीबैल, कडकलक्ष्मी इत्यादी महाराष्ट्राच्या लोककलांचे दर्शनही या वेळी घडणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणाच्या ५० व्या स्मृती वर्षांची आणि कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचे प्रणेते एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांची स्मृती यात्रेच्या निमित्ताने जपण्यात येणार आहे. कला दिग्दर्शक तुषार कोळी ‘जय मल्हार’चा भव्य देखावा साकारणार आहेत.
त्याशिवाय गिरगाव ध्वजपथक, गजर ढोल पथक, जगदंब ढोल पथक यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. या पथकांमध्ये तब्बल १२०० युवक-युवती भाग घेणार आहेत. त्याचबरोबर महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, नयनरम्य संस्कार भारती रांगोळ्या यात्रेचे वैशिष्टय़ बनणार आहेत. यात्रेच्या शेवटी रस्ता स्वच्छ करण्यासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता पथक सज्ज राहणार आहे.
या यात्रेसाठी प्रथमच लावणीसम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव परिसरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित मान्यवरांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे सचिवपद प्रसिद्ध उद्योजक अजित बेडेकर भूषवीत आहेत. ठाकूरद्वार नाक्यावर सकाळी ११.३० च्या सुमारास आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष संकल्प सभेत निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार मार्गदर्शन करणार आहेत. यात्रेची सांगता शामलदास गांधी मार्गाजवळ श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास आयोजित श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने होईल.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2015 रोजी प्रकाशित
गिरगावच्या नववर्ष यात्रेत ‘पंढरीची वारी’
भारताची राजधानी नवी दिल्लीमधील राजपथावर प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या ‘पंढरीच्या वारी’चा चित्ररथ गिरगावकरांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-03-2015 at 08:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi new year gudi padwa celebration in girgaon