मराठय़ांच्या इतिहासाचे आद्य अभ्यासक, प्रवर्तक, संशोधक आणि विद्वान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतातही ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ अर्थात वि. का. राजवाडे यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एका आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विलेपार्ले येथील जनसेवा समितीतर्फे येत्या २ फेब्रुवारी ‘इतिहाचार्य वि. का. राजवाडे स्मृती अभ्यासवर्ग’ आयोजित करण्यात आला आहे. राजवाडे यांच्या कार्याची ओळख सगळ्यांना व्हावी, या उद्देशाने हा वर्ग आयोजित करण्यात आला आहे. संस्थेतर्फे यापूर्वी शिवाजी महाराज आणि मराठय़ांच्या इतिहासावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात व्याख्याने, अभ्यासवर्ग, दुर्गभ्रमंती आदींचा समावेश आहे.
१९१३-१४ हे राजवाडे यांचे १५० वे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमात मराठय़ांच्या पराक्रमी इतिहासाचा विविध अंगाने वेध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अभ्यासवर्गात निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, डॉ. सदाशिव शिवदे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयात हा अभ्यासवर्ग होणार आहे.
इतिहाचार्य वि. का. राजवाडे-व्यक्ती आणि कार्य, वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावना, मराठय़ांच्या इतिहासाची साधने, राजवाडे यांचे महत्वाचे लेख आदी विषयांवर अभ्यासवर्गात व्याख्याने होणार आहेत. अभ्यासवर्गाचा समारोप उपस्थित मान्यवर वक्ते आणि सहभागी यांच्या थेट प्रश्नोत्तराने होणार आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी पराग लिमये (९९८७५६५७३८), अमोल मांडके (९००४६५७६६३), संजय तळेकर (७७३८७९११०२) यांच्याशी संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study workshop on historian v k rajwade