गेल्या अनेक दिवसांपासून डेग्यूसंदर्भात जनजागृती केली जात असली तरी हनुमाननगर आणि लकडगंज झोनमध्ये सर्वाधिक डासअळी असलेली घरे आढळून आली आहेत.  या भागात विशेषत्वाने उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. सोबतच डासअळीवर नियंत्रणासाठी महापालिकेतर्फे कडूलिंबापासून तयार होणाऱ्या नीम ऑईलचा उपयोग केला जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने या कीटकनाशाच्या उपयोगासाठी परवानगी दिली असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली.
वाढत्या थंडीमुळे डेंग्यूचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, अनेक उपाययोजना करूनही आणि जनतेमध्ये जनजागृती केल्यानंतर आरोग्य विभागाला डेग्यूंवर नियंत्रण मिळविणे शक्त होऊ शकले नसल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डेंग्यूच्या सध्या स्थितीबाबत झोननिहाय आढावा घेण्यात आला. ज्या भागात आरोग्य सभापती प्रतिनिधीत्व करतात त्याच हनुमानगर प्रभागात सर्वाधिक डासअळीचे प्रमाण आढळून आले आहे. आरोग्य विभाग गेल्या चार महिन्यांपासून घरोघरी डेंग्यूबाबत जनजागृती आरोग्य विभागातर्फे करण्यात येत असली तरी उपाययोजना पुरेशा नसल्याचे मत दटके यांनी व्यक्त केले. डेंग्यूचा प्रकोप असलेल्या भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा, शिवाय या भागात एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use neem oil to control mosquito