नवीन इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये करदिलासा मिळेल असं भासवण्यात आलं असलं तरी प्रत्यक्ष परिस्थिती तशी नसल्याचे समोर येत आहे. नवीन टॅक्स स्लॅब हे पर्यायी असून त्याची निवड केल्यास आधीच्या रचनेतील सुमारे ७० प्रकारच्या करसवलती व करवजावटींवर पाणी सोडावे लागणार आहे. या सवलतींवर पाणी सोडायचे नसेल तर जुनीच करप्रणाली सुरू ठेवण्याचा पर्याय करदात्यांसमोर खुला आहे. यामुळे करदात्यांच्या पदरात भरपूर सवलत पडली व भरपूर पैसे हातात येतील असे चित्र उभे झाले असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन पर्याय निवडल्यास आधीप्रमाणेच पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या कोणालाही यापुढे कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. मात्र आधीच्या कररचनेत ५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागत होता. आता त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. नवीन पर्याय स्वीकारल्यास ५ लाख ते ७.५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर लागेल आणि ७.५ ते १० लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. अर्थात, हा फायदा जवळपास ७० करसवलतींवर पाणी सोडले तरच मिळणार आहे. थोडक्यात करदात्यांना एका हातानं लाभ देऊन दुसऱ्या हातानं तो काढून घेतल्याचं दिसत आहे.

यातली विशेष बाब म्हणजे नवीन करप्रणालीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त कर जाणार आहे की खरंच कर वाचणार आहे हेच स्पष्ट होत नाही. बजेटनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितलं की जवळपास १०० च्या आसपास करसवलती व करवजावटी जुन्या करप्रणालीमध्ये आहेत. त्यातल्या जवळपास ७० सलवतींवर नवीन करप्रणाली स्वीकारली तर पाणी सोडावं लागणार आहे. या नक्की कुठल्या आहेत, व राहिलेल्या सवलती कुठल्या आहेत हे ही स्पष्ट नसून या गोष्टी लवकरच वेबसाईचवर अपलोड करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे तूर्तास तरी हुरळून जाण्यासारखी स्थिती नसून करदात्यांना खरंच कमी कर भरावा लागणार आहे की या सरकारनं आवळा देऊन कोहळा काढला हे समजायला काही वेळ जावा लागणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New tax slab tax saving or gimmick by government budget